माणगाव ः प्रतिनिधी
मुरूडप्रमाणेच माणगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांनाही राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तब्बल दोन महिने लोटले तरीही मदत मिळाली नसल्याने बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत.
माणगाव तालुक्यातील 2162.71 हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 8343 शेतकर्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाने हा विषय लावून धरल्याने राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले व मदत जाहीर केली. शासनाच्या आदेशानुसार महसूल व कृषी खात्याने 19 ऑक्टोबरपासून पंचनाम्यांची कामे सुरू केली होती. दोन महिन्यांपूर्वी ती पूर्ण झाली. त्यामुळे दिवाळीपर्यंत आपल्याला नुकसानभरपाई मिळेल या आशेवर माणगाव तालुक्यातील बाधीत शेतकरी होते, मात्र शासनाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
दरम्यान, शासनाकडून नुकतेच माणगाव तहसील कार्यालयाकडे एक कोटी आठ लाख रुपये नुकसानभरपाईसाठी प्राप्त झाले असून, ती शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper