Breaking News

मुंबईकरांनी आधीच खूप भोगलेय, त्यांना आणखी त्रास नको -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 20) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल स्पष्टीकरण दिले. यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!,’ असे आवाहन फडणवीस यांनी ठाकरे यांना केले आहे.

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही, पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे. ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय चार वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता, अशीही विचारणा फडणवीस यांनी केली आहे.

बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार, हेदेखील फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply