पनवेल : रामप्रहर वृत्त
साहित्य हे जगण्याला आत्मबळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समूहाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात बोलत होते. रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झालेल्या स्नेहमेळाव्यास कवी अरुण म्हात्रे, प्रा. एल. बी. पाटील, कवी साहेबराव ठाणगे, सतीश सोलांकुरकर, कोमसाप दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, केंद्रीय वाड्मयप्रमुख सुनंदा देशमुख, केंद्रीय संमेलनप्रमुख सुधीर शेठ, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, उद्योजक प्रदीप गांधी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अशोक बागवे यांनी सांगितले की, शब्द ही शस्त्र आहेत. कवितेतील शब्द एकमेकांवर उजेड पाडतात. शब्द म्हणजे श्वास, शब्द म्हणजे घाम, शब्द म्हणजे अश्रू आहेत. त्यामुळे साहित्यिकांनी शब्दांना समजून घेतले पाहिजे. कविता ही साहित्यातील अहिंसा आहे. कविता कोणालाही भीत नाही. कविता धाडसी असते. कला ही एकांतात निर्माण होते. बुद्धी आणि मन यांच्या संगमातून कविता बाहेर येते. कविता निर्माण करण्याच्या शाळा नाहीत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्याचा मधुघट समूहाचे हेमंत बारटक्के यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध साहित्य उपक्रमांची माहिती दिली. दुपारच्या सत्रात समूहातर्फे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात कवींनी सामाजिक, राजकीय आदी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. कवींना समूहातर्फे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रायगड जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते. स्नेहमेळाव्याचे संयोजन साहित्याचा मधुघट समूहाचे रघुनाथ पोवार, अजित शेडगे, हेमंत बारटक्के, सिद्धेश लखमदे, श्रेयस रोडे, रातवड माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांनी केले होते.