दुबईत पाठवणार शेतातील माल
रांची : वृत्तसंस्था
निवृत्ती स्वीकारलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटनंतर काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे.
रांचीच्या भाजी बाजारामध्ये धोनीच्या शेतमालाला प्रचंड मागणी आहे. मटार आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला मोठी मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या कॉलिफ्लॉवरचे उत्पादन घेण्यात आले आहे. 20 ते 25 रुपये किलोने विकला जाणार्या या कॉलिफ्लॉवरची चव केमिकलयुक्त भाजीपेक्षा वेगळी आहे. माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रुपये किलो भाव असून, 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार धोनीच्या शेतातील फळभाज्या दुबईला पाठवण्यात येणार आहेत आणि याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. झारखंड्या कृषी विभागाने धोनीच्या शेतातील माल दुबईला पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे. यूएईत कोणत्या एजन्सीला फळभाज्या विकण्यासाठी द्यायच्या हेही ठरले आहे. ऑस सीजन फार्म फ्रेश एजन्सीने ही जबाबदारी घेतली आहे.
फार्म हाऊसमध्ये कोंबड्या आणि गायी
विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लेदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास दोन हजार कोंबडे आहेत, तर येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गायी
आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गायींच्या दुधाची विक्री बाजारात केली जात आहे.