भंडारा : प्रतिनिधी
भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे रुग्णालयातील एका नर्सच्या निदर्शनास आल्याने तिने दार उघडून बघितले असता, सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकार्यांना दिली. त्यानंतर रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागात आऊटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले, तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त नवी दिल्ली : भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ’महाराष्ट्राच्या भंडार्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली जिथे आपण अनमोल निरागस बालकांना गमावले. शोकाकूल कुटुंबासोबत माझी सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भंडार्यातील घटनेबद्दल शोक व्यक्त करून राज्य सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.