Breaking News

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणाला सुरुवात

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण शनिवारी (दि. 1) महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवर सुरू करण्यात आले. लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा शनिवारी दुपारी 1 वाजता प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार आजच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तत्काळ नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण केवळ कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणार्‍यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. लसीकरण सुरू करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पुढील प्रमाणे आहेत.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3 नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 खारघर या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील अशा व्यक्तींना त्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करून लसीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विनाकारण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात आले आहे.

भविष्यात लसींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. तथापि, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply