Breaking News

सार्वजनिक जीवनातील पथ्ये

एखाद्या लोकप्रतिनिधीचे खाजगी प्रकरण जाहीररित्या चर्चेत येऊ न देण्याचा अन्य नेतेमंडळींनी प्रयत्न केला तरी समाजमाध्यमांमध्ये असली प्रकरणे अत्यंत चवीने चघळली जातात. तसे पाहता अशाप्रकारचे वर्तन दुर्दैवीच म्हणायला हवे. कारण लोकप्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यातील ढवळाढवळ चव्हाट्यावर आणली की राजकारणाचा दर्जाही तितकाच खालावत जातो.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता 73 वर्षे होऊन गेली. या सात दशकांपेक्षाही अधिक काळामध्ये भारताने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राजकारणाचे वेगवेगळे रंग पाहिले. आभाळाएवढे मोठे नेतेही पाहिले आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकीय गुंडदेखील पाहिले. लोकशाही व्यवस्थेमध्ये साधनशुचितेचे महत्त्व प्रारंभापासूनच अधोरेखित झाले, कारण देशाच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींसारख्या महान, निष्कलंक चारित्र्याच्या नेत्याने केलेल्या मार्गदर्शनानुसार लढला गेला. लोकांचा नेता किंवा प्रतिनिधी हा सत्शील, चारित्र्यसंपन्न आणि स्वच्छ असावा अशीच अपेक्षा होती. तशा प्रकारचे उत्कृष्ट नेतृत्व वेळोवेळी आपल्याला पहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या पैशाची लूटमार करणारे काही चारित्र्यहीन पुढारीदेखील दुर्दैवाने देशाच्या नशिबी आले. काळाच्या ओघामध्ये सार्वजनिक जीवनातील नीतीमत्तेचे नियम थोडेफार बदलत गेले. नेता किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात वावरत असला तरी त्याचे खासगीपण शक्यतो जपले पाहिजे असा कल आधुनिक राजकारणात दिसून येतो. निवडणूक किंवा सत्ताकारणाच्या निमित्ताने एकमेकांवर चिखलफेक करणारे पुढारी खासगी वाभाडे मात्र जाहीररित्या काढण्याचे टाळतात. ते योग्यच आहे. समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे हे पथ्य पाळणे हल्ली शक्य होत नाही हेदेखील मान्य केले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातम्यांना सध्या ऊत आला आहे. तो पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाला काय झाले आहे, असा प्रश्न कुठल्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होतानाही दिसते आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये अतिशय प्रगल्भ प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांना मसाला मिळेल असे कुठलेही वक्तव्य आपण करणार नाही. पोलिसांच्या तपासामध्ये आधी सत्य बाहेर येऊ दे. मगच त्यावर बोलू, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. विरोधी पक्षनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रतिक्रियेकडे बोट दाखवता येईल. अशा प्रकरणांमध्ये काही दिवस खमंग चर्चा रंगतात. साधनशुचिता, सार्वजनिक जीवनातील नीतीमत्ता अशा मुद्द्यांचा ऊहापोह होतो. हा राजकारणाचा आखाडा आहे आणि राजकीय पक्ष राजकारण केल्याशिवाय कसे राहतील? सनसनाटी निर्माण करणारी खासगी प्रकरणे बाहेर आली की सारेच त्या विरोधात बोलणार हेदेखील ओघाने आलेच. राजकारण साधणारे आपला डाव साधून जातात. सत्य दूरच राहते आणि मागे उरते ती फक्त संबंधित नेत्याची बदनामी. अशावेळी संबंधित नेत्याने स्वत:च राजीनामा देऊन पुढील चर्वितचर्वण टाळावे हे उत्तम. सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना काही पथ्ये पाळावीच लागतात. मग ती राजकीय असोत किंवा खासगी जीवनातील असोत. हे भान सुटले की असली प्रकरणे निष्कारण चव्हाट्यावर येतात. हे होता होईतो टाळायला हवे. ताज्या प्रकरणाचा हाच वस्तुपाठ घेऊन ठाकरे सरकारने योग्य ती पावले उचलावीत एवढीच अपेक्षा.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply