पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील सेक्टर 15 मधील शांतीवन असोशिएशनने प्रजासत्ताकदिनी कोरोना काळात सेवा देणार्या महिला स्वच्छता दूताचा सन्मान साडीचोळी, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन केला.
कोरोना काळात नवीन पनवेल येथील शांतीवन असोसिएशनच्या स्वच्छता कर्मचारी गंगुबाई पाईकराव यांनी दिलेल्या अखंड स्वच्छता सेवेमुळे येथील रहिवाशी भारावुन गेले होते. त्यांनी रुजु केलेल्या स्वच्छता सेवेच्या माध्यमातुन एकप्रकारे उपकारच असोसिएशवर झाल्याची भावना वसाहतीत पसरली होती.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून असोशिएशनच्या कार्यालयात ध्वज वंदना नंतर एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कोरोना दूतांचा मोठा वाटा आहेच, पण अशिक्षित गरीब असणार्या गंगुबाईंसारख्या अनेक त्यागी व्यक्तींचा खारुताई समान सहभाग असल्याने आम्ही त्यांचा सन्मान करीत असल्याचे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाश विचारे यांनी सांगितले.
संस्थेचे माजी अध्यक्ष जयराम मुंबईकर यांच्या हस्ते गंगुबाईंना 11 हजार रुपये रोख, साडीचोळी श्रीफळ व सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उद्यान कर्मचारी परशुराम पाटील यांनाही सुधाकर सोनावणे यांचे हस्ते पाच हजार रुपये रोख व शुभ्रवस्रांकारसह सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी असोशिएशनचे अध्यक्ष काशिनाथ भोईर, सचिव अजित पावसकर आणि इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.