भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उतार्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकर्यांना पिक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो. महसूल विभागाने इ-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापूर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा होता. मात्र, आताच्या डिजिटल सातबारामुळे शेतकर्यांना अधिक अचूक मिळणार आहे. नव्या रुपातील या अद्ययावत उतार्याची माहिती शेतकर्यांपर्यंत पोचावी, यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी मोफत सातबारा वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे. याद्वारे राज्यात सुमारे चार कोटी सातबारा उतार्यांचे वाटप होणार आहे. महात्मा गांधी जयंतीपासून या मोहिमेची सुरूवात झाली आहे.
आजच्या आधुनिक युगात महसूल विभागानेही पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा हाती घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागाचे अनेक उपक्रम हे डिजिटल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व शेतकर्यांचे कागदोपत्री असलेले सातबारा व आठ इ हे उतारे महसूल विभागाने ऑनलाइन उपलब्ध करुन दिले आहेत. हे सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सातबारा डिजिटल करण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकर्याला राज्याच्या कानाकोपर्यातून एका क्लिकवर सातबारा उपलब्ध व्हावा हे आहे.
शेतकर्यांना डिजिटल सातबारा काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयांमध्ये ये-जा करण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाइलवर किंवा संकेतस्थळावर जाऊन काढू शकता. तो तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा वापरता येईल. यासंबंधी महसूल विभागाने एक शासन निर्णयसुद्धा जारी केला आहे. त्यामुळे आता सर्व पतसंस्था, सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांमध्ये डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा चालणार आहे. तसेच यापुढे सर्व शेतकर्यांना सेतू मार्फत डिजिटल सातबारा उतारा दिला जाणार आहे.
सातबारा उतार्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वीपेक्षा सोप्या व सुटसुटीत पद्धतीत हा उतारा आता मिळणार आहे. क्यूआर कोड, राजमुद्रा असलेला हा नव्या स्वरूपातील सातबारा ऑनलाइन उपलब्ध असला तरी अद्याप सर्वच खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात ऑनलाइन उतारा काढण्याची सोय उपलब्ध होईलच असे नाही. तसेच नव्या स्वरुपातील सातबारा उतारा कसा आहे, हे शेतकर्यांनाही कळावे, यासाठी गावोगावी शेतकर्यांना मोफत सातबारा वाटप सुरू आहे. या उतार्यासोबत एक प्रतिसाद फॉर्म दिला जात आहे. यामध्ये आपल्या सातबारा उतार्यात काही त्रुटी, दुरुस्ती असतील तर त्याची माहिती द्यायची आहे. त्यानुसार, नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ही मोहीम सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सुमारे पाच लाख 24 हजार 491 खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहीम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी पाच लाख चार हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत सुमारे सव्वा लाख सातबारा उतार्यांचे वाटप ठाणे जिल्ह्यात झाले आहे. तर पालघरमध्ये चार लाख 96 हजार 118 सातबारा आहेत. रत्नागिरीमध्ये 20 लाख 22 हजार 678 सातबारा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. तर रायगड जिल्ह्यात एकूण 11 लाख 52 हजार 621 सातबारा उतारे आहेत. त्यापैकी नऊ लाख 89 हजार 663 उतार्यांचे वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 90 हजार उतार्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.
डिजिटल भूमी अभिलेख कार्यक्रम
इ-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणार्या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा अद्ययावत उतार्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात तलाठ्यांमार्फत सातबारा वाटपास सुरूवात झाली आहे. शेतकरी बांधवांनी या मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सातबारा मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नव्या स्वरुपातील डिजिटल सात बाराचे मोफत वाटप सुरू असले एका खातेदारास एकदाच हा सातबारा मोफत मिळणार आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास ऑनलाइन पद्धतीने हा सातबारा आपल्याला काढता येणार आहे. त्यासाठी लर्हीश्रशज्ञह.ारहरलर्हीाळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा व आठ इ उतारा मिळवता येणार आहे. सर्वच शासकीय उपयोगासाठी हे डिजिटल स्वाक्षरी सातबारा व आठ इ उतारे ग्राह्य धरले जात असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरली नाही. माहिती तंत्रज्ञानाचा सर्व शेतकर्यांनी लाभ घेतल्यास त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.
-नंदकुमार वाघमारे, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोंकण
RamPrahar – The Panvel Daily Paper