Breaking News

रायगडातील आंबा विक्रेत्यांची आज अलिबागमध्ये नोंदणी

अलिबाग : प्रातिनिधी

हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीकरिता रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना आता रत्नागिरी येथे जाण्याची गरज नाही. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादकांची नोंदणी मंगळवारी (दि. 9) अलिबाग येथे होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना संबंधित नोंदणी रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यालयात करावयाची आहे. मात्र जिल्ह्यातील  शेतकर्‍यांना रत्नागिरीपर्यंत जाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक बाणखेले यांनी पुढाकार घेऊन कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांच्या पदाधिकार्‍यांना रायगड जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे मंगळवारी आमंत्रित केले आहे. त्या दिवशी जिल्हा कृषी कार्यालयात आंबा उत्पादक शेतकर्‍यांची नोंदणी करण्यासाठी लागणारे फॉर्म भरून घेऊन संपूर्ण प्रक्रिया तात्काळ करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी त्यांच्या हापूस आंबा लागवड असलेल्या जमिनीच्या सातबार्‍याचे   मागील तीन महिन्यातील  उतारे, बागेच्या जमिनीचा नकाशा, मतदार ओळखपत्राची सत्यप्रत किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची सत्यप्रत, एक फोटो व  दोन हजार 10 रुपयांचा कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नावाने धनादेश किंवा रोख रक्कम घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, रायगड  वेश्वी, अलिबाग येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता उपस्थित  राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व डॉ. संदेश पाटील यांच्याशी (9158752526) संपर्क साधावा.

आंबा विक्रेत्यांची नोंदणी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील आंबा शेतकर्‍यांना रत्नागिरीमध्ये जावे लागते. त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांना अलिबागमध्ये निमंत्रित केले आहे. यावेळी ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी घ्यावा.

-उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक, रायगड

Check Also

पनवेलमध्ये वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते -रामेश्वर नाईक पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply