पनवेल : प्रतिनिधी
आपल्याकडे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करीत असल्या तरी पेट्रोल पंपावर महिला काम करीत नव्हत्या. पण आता नवी मुंबई आणि पनवेलमध्ये महिला पेट्रोल पंपावर काम करताना दिसतात. महिला दिनानिमित्त पनवेलमधील शासकीय विश्राम गृहासमोरील भारत कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणार्या तिघींनी आपल्या कुटूंबाच्या पाठिंब्यामुळेच आपण काम करीत असल्याचे सांगितले.
अंजली वाईकर नवीन पनवेलमध्ये राहते. त्या म्हणाल्या की, आपल्याकडे पेट्रोल पंपावर महिला काम करीत नव्हत्या. माझ्या पतीने इतर ठिकाणी पेट्रोल पंपावर महिलांना काम करताना पाहिले आणि स्वत:च मला परवानगी दिली. आमच्या घरच्यांचा आम्हाला पाठिंबा असल्याने आम्ही पेट्रोल प्ंपावर काम करू शकतो. आमच्या आजूबाजूचे आणि काही नातेवाइक नावे ठेवतात पण आम्ही दुर्लक्ष करतो. या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये ड्यूटी आहे. दुपारी कामावर येताना मी रात्रीचे जेवण बनवून आणि माझ्या लहान मुलाचे सगळे करून येते. माझे पती आणि सासूबाई ही समजून घेऊन मला मदत करतात. मी अडीच वर्षे येथे काम करीत आहे, मला पती आपले काम सांभाळून कामावर सोडायला आणि न्यायला येतात.
दिपाली सकपाळ दीड वर्ष येथे काम करीत आहे. ती म्हणते आम्ही येथे काम करतो याचे अनेक ग्राहकांना कौतुक वाटते. आमच्या घरच्यांना आमचा खूप अभिमान आहे. जान्हवी खान मुळची बिहारच्या पटणाची ती पदवीधर असून तिने संगणक कोर्स केले आहेत. लॉकडाऊन पूर्वी बँकेत काम करीत होती ती नोकरी गेल्यावर आता पनवेलमधील भारत पेट्रोल पंपावर काम करीत आहे. वडील सौदीला काम करतात. ती म्हणते मी मुस्लिम समाजातील असले तरी माझ्या घरच्यांना माझा गर्व आहे की आपली मुलगी शिकली आणि आपल्या पायावर उभी आहे. आमचे काही शेजारी मुलगी असून बाहेर काम करते म्हणून नावे ठेवतात पण मला दुनियादारीशी काही देणे घेणे नाही. माझ्या पालकांची काही हरकत नाही त्यामुळे मी त्यांची फिकीर करीत नाही.