Breaking News

राज्यात निर्बंध वाढले

खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थितीचे बंधन

मुंबई ः प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असल्याने आरोग्य विभागासह राज्य सरकारची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. सरकारकडून या संदर्भातील नियमावली शुक्रवारी (दि. 19) जाहीर करण्यात आली.
राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. याआधी सरकारने हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर आता सरकारने नव्याने नियमावली जारी करीत खासगी कार्यालयांवर निर्बंध घातले आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक,
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असे या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थितीदेखील 50 टक्के करण्यात आली आहे. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कुठल्याही आस्थापनामध्ये तोंडावर मास्क असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणी आवश्यक आहे, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. लोकांकडून कोरोना नियमाचे पालन करवून घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असेल याची खातरजमा करून घ्यावी. शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्चपर्यंत अमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
मुंबईत मॉल्स, स्टेशनवर अ‍ॅन्टिजेन चाचणी अनिवार्य
मुंबई ः मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर महापालिका प्रशासनाने मॉल्स, रेल्वे-बसस्थानके अशा गर्दीच्या ठिकाणी अ‍ॅन्टिजेन चाचण्या करणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार चाचण्या करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. सध्या प्रतिदिन 20 ते 23 हजार चाचण्या होत आहेत.
मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये येणार्‍या प्रत्येक ग्राहकाची अ‍ॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटस्च्या स्टाफची कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे, तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणार्‍या सात मुख्य स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान एक हजार प्रवाशांच्या चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply