दुबई ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी पोहचला, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये फ्लॉप ठरलेल्या के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. राहुलची एका स्थानाने घसरण झाली असून, तो फलंदाजाच्या यादीत आता पाचव्या स्थानी पोहचला आहे. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान 892 गुणांसह क्रमवारीत अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच या क्रमवारीत 830 गुणांसह दुसर्या, तर पाकिस्तानचा बाबर आझम 801 गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात 762 गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराटने दमदार प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत तीन वेळा 70पेक्षा जास्त धावा काढणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
गोलंदाजांमध्ये शस्मी सरस
आयसीसीच्या टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने राशिदचे अव्वल स्थान हिसकावले आहे, तर राशिद दुसर्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलूंमध्ये नबी पहिला अष्टपैलू
खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. यात पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि दुसर्या स्थानी बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसन आहे.