Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

लोकांच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करण्याचे काम -आमदार गणेश नाईक
आरोग्य महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे. त्यामुळेच ते समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) खांदा कॉलनी येथे काढले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडानिमित्ताने सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबिर यशस्वीपणे पार पडले. या 15व्या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, आम्ही महाविद्यालयात असल्यापासून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव सतत ऐकत असायचो. माणसाकडे कितीही पैसा असू दे भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. त्यामुळे ठराविक रेषेपर्यंत पैशाला महत्त्व आहे. पैशाच्या राशीत झोपणार्‍या माणसांपेक्षा प्रामाणिकपणे आयुष्यभर लोकं जोडण्याचे आणि लोकांची सेवा करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करीत असतात. म्हणूनच त्यांच्या नावाला शेठ हे नाव आदराने जोडले गेले आहे. जीवन जगत असताना खर्‍या अर्थाने समाजाची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सेवा ही समर्पण धोरणाप्रमाणे रामशेठ ठाकूर आणि त्यांची दोन्ही मुले काम करीत आहेत.
रामायणाने कसं जगावे शिकवले, महाभारताने कसं जगू नये शिकवले, तर समाजाला सोबत घेऊन लोकांची सेवा करण्यासाठी कसं जगावे हे भगवद्गीताने शिकवले आहे आणि कदाचित रामशेठ ठाकूर यांनी भगवद्गीता वाचली असेल. म्हणूनच ते अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. जीवनाला पूर्णत्वास नेण्यासाठी दोन पैलू आहेत. आपण परमेश्वराचे रूप आहोत आणि जगात सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना ठेवून जगात जनार्दन शोधण्याचे काम करतो तोच अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. म्हणून सामाजिक संवेदनेने जो काम करतो तो उपचाराने बरा झालेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरच्या आनंदाने आनंदित होतो आणि हा आनंद सामाजिक सेवेच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी मिळवत आहेत. समाज सर्वांगसुंदर आणि उन्नत बनवायचा असेल, तर जी कर्तव्य आपल्याला पार पाडायची आहेत ती पार पाडताना धर्माचे आचरण आपण करतो म्हणून सेवेचा धर्म आत्मसात करतो तो खरा धर्म आहे. रस्ता सुंदर असेल तर रस्ता कुठे जातो विचारले पाहिजे, पण धेय्य जर सुंदर असेल तर रस्ता कुठे जातो विचारायची गरज नसते. लोकं आपोआप तुमच्या पाठी चालायला लागतात आणि त्या अनुषंगाने रायगडमध्ये ध्येय चांगले ठेवून रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संस्था काम करीत आहे. त्यामुळे समस्त समाज रामशेठ ठाकूर यांच्या पाठीशी राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहे आणि ही उल्लेखनीय बाब असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अधोरेखित केले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रामशेठ ठाकूर मुळातच गुरुवर्य असल्याने दया, क्षमा, शांती या गोष्टीची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समाजकार्य, राजकारण क्षेत्रात त्यांनी प्राविण्य मिळविले. स्वतःचे जीवन घडवताना समाजाच्या अडीअडचणी ओळखून समाजातील रंजल्या गांजलेल्या घटकांना सर्व स्तरावर मदतीचा हात देण्याचे काम रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून झाले. आरोग्यसेवेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये भूतकाळात एवढा मोठे महाशिबिर झाले नाही आणि हे करताना विनम्रता आहे. रामशेठ ठाकूर यांच्या कुटुंबात जन्म घेतलेले आमदार प्रशांत ठाकूर अतिशय संयमी, विवेकी, सर्व गुणसंपन्न असून जीवन कृतार्थ करण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकणारी ही पिढी आहे. प्रत्येक जण आपला संसार चांगला व्हावा, मुले सुशिक्षित व्हावीत यासाठी प्रयत्नशील असतो, मात्र रामशेठ ठाकूर यांनी लोकांच्या अंधारलेल्या वाटांना सेवेरूपपणे प्रकाशमय करण्यासाठी प्रशांत आणि परेशलाही वारसा दिला आहे आणि दुसर्‍याचे दुःख हलके करण्यासाठी अविरतपणे काम सुरू आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची 1996 साली स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे समाजसेवेचे व्रत सुरु आहे. या माध्यमातून वर्षभर आपण समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. लोकांच्यात सतत राहणे आणि त्याची सेवा करणे आपला धर्म आहे. त्या अनुषंगाने वाटचाल करताना कार्यकर्ते, हितचिंतकांची मोलाची साथ मिळत असते. म्हणून आपण हे समाजसेवेचे उपक्रम यशस्वी करत असतो, असेही त्यांनी अधोरेखित केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत देशाला आणि राज्याला विकसित करण्याची व गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करीत आहेत. नामदार कपिल पाटील हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, मात्र मेहनतीने पुढे आलेले नेतृत्व आहे. देशाच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते काम करीत आहेत. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटीलसाहेबांचे नाव देण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे असे सांगतानाच थोड्या दिवसातच ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला मिळेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हे महाशिबिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून ज्या दिवशी सूत्रे हाती घेतली त्या दिवसापासून देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्यांनी योजना अंमलात आणल्या आणि त्यानुसार देशाच्या प्रगतीला चालना मिळाली. देशाचा विकास आणि आरोग्य व्यवस्था याच्यावर त्यांनी विशेष भर दिला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचे कार्यक्रम सतत राबविले जात असल्याचे सांगून यासाठी आपणा सर्वांची मदत मोलाची असते, असेही त्यांनी म्हटले.
प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी केले. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आगरी समाजाचे भिवंडी अध्यक्ष अरुण पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीता पाटील, पनवेल मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अमोघ ठाकूर, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या महाशिबिरास स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मेवाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या वेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड, तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा 11 हजार 352 नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply