आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील एसटी बस आगाराजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या पुतळ्याच्या सभोवताली संसद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) येथील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. येत्या 14 एप्रिलपूर्वी म्हणजेच डॉ. आंबेडकर जयंतीच्या आधी हे काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगडसह कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरण कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर व सत्ताधारी भाजप, आरपीआय, तसेच संस्थांनी मागणी व आग्रह धरला होता. त्या अनुषंगाने या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या 1 मार्च 2019 रोजी मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊन मागील महिन्यात लोकार्पण झाले. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची आयुक्त सुधाकर देशमुख व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी केली. नगरसेवक तेजस कांडपिळे, शहर अभियंता संजय कटेकर सोबत होते.
संसद प्रतिकृती अन् चवदार तळे सत्यागृह तैैलचित्र
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण अत्यंत विलोभनीय आहे. त्याच धर्तीवर 55 लाख रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होत आहे. या ठिकाणी संसद भावनाची प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू असून त्यावर डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात येणार आहे, तसेच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे तैलचित्र या ठिकाणी रेखाटण्यात येणार आहे.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. काम वेगाने
आणि चांगल्या दर्जाने होत असल्याबद्दल समाधानी आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका