लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनतेसाठी रामबागची भेट
पनवेल : दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले त्याचप्रमाणे न्हावे खाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी ‘रामबाग’ फुलली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हि अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. त्यानिमित्ताने ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ महाराष्ट्राच्या नावलौकिक वाढवणारे असे उद्यान आता पनवेल तालुक्यात साकारले आहे.
१४ एकर जागेतील या ‘रामबाग’ उद्यानात प्रथम भव्य आणि सुरेख प्रवेशद्वाराने होणारे स्वागत अत्यंत प्रफुल्लित करते. निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना येथे पहायला मिळतात, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन असे दोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक या ठिकाणी आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. या सोबतीनेच वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, सुरक्षा, प्रसाधनगृह अशी दर्जेदार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर या उद्यानातून बाहेर पडताना आपण या ‘रामबाग’ला दिलेल्या भेटीबद्दल आभार मानणारे शब्दही मनाला आनंद देणारे आणि पुन्हा या रामबागेत येण्याची ओढ लावून जाते. विशेषतः या ठिकाणी लहानग्यांपासून वृद्धांचा विचार आवर्जून करण्यात आला आहे.
श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या ‘रामबाग’ या उद्यानाचा लोकार्पण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे नातू अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते (गुरुवारी, दि. २२) सायंकाळी पार पडला. या सोहळ्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, ओबीसी नेते जे. डी. तांडेल,रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. गणेश ठाकूर, ज्येष्ठ नेते कान्हाशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, माजी उपमहापौर सीता पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, ज्येष्ठ पत्रकार दा. चा. कडू गुरुजी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, समीर ठाकूर, कामोठे भाजपचे अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, कल्पना ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण उपसरपंच विजय घरत, म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर, सागर ठाकूर, स्वप्निल ठाकूर, प्रतिक ठाकूर, प्रल्हाद पाटील, ठाकूर कुटुंबिय आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
न्हावे खाडी हा परिसर खाडी किनारी आणि अत्यंत चिखलमय. या ठिकाणी सर्वत्र चिखल असेच चित्र होते. आणि त्या ठिकाणी म्हसेश्वर मंदिर छोटे होते. या मंदिरात जातानाही चिखल तुडवत जावे लागत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी याकडे अत्यंत जिव्हाळ्याने पाहिले आणि या मंदिराचा आणि परिसराचा कायापालट एक स्वप्ननगरीत करण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि त्यांनी स्वखर्चाने प्रत्यक्षात उतरवली ती भव्य दिव्य अशा ‘रामबाग’ उद्यानात. आणि त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे स्वप्न या ठिकाणी साकार झाल्याने ग्रामस्थांनी भव्य पुष्पहाराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हृदयी अंतकरणाने आभार मानत आदर व्यक्त केले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, मी लहान असताना येथील खाडीचा बंधारा फुटला होता. आणि त्यामुळे न्हावाखाडी, गव्हाण, कोपर येथील १२०० एकर पूर्ण जमीन समुद्राच्या पाण्याखाली गेली. त्यावेळी सरकारचे खारलँड नावाचे बोर्ड होते आणि बंधाऱयांच्या दुरुस्तीचे काम झाले पण तत्कालीन सरकारने त्याकडे गांभीर्यांने लक्ष दिले नाही, त्यामुळे हि सर्व जमिन चिखलाची झाली. या ठिकाणी असलेल्या म्हसेश्वर मंदिरात जातानाही चिखलातून वाट काढावी लागत होती आणि त्याबद्दल मनाला खंत असायची. आपण या ठिकाणी जन्मलो, वाढलो, प्राथमिक शिक्षण घेतले, खासदार झालो, त्या गावाच्या लौकिकासाठी काही तरी वेगळे केले पाहिजे हा उद्देश मी मनाशी बांधला होता. देवळात जाताना चिखलातून जावे लागत होते आणि आताची लहान मुलांची पिढी आहे त्यांना खेळायला, फिरायला जागा नाही, २०० मीटर च्या पुढे फिरता येत नाही, त्यामुळे आयुष्यात काही तरी केले पाहिजे कि त्यातून गावाला अधिक नावलौकिक मिळेल. म्हणूनच गेल्या पाच सहा वर्षांपासून रामबागचे स्वप्न डोक्यात होते. माझ्या गावाकरिता मी काही करू शकलो तर माझ्या जीवनाचा सार्थक होईल आणि ते या उद्देशाने झाले आहे. म्हसेश्वर देऊळ आणि रामबाग तयार झाले याचा मला अत्यंत आनंद झाला आहे. पनवेल, उरणच नव्हे तर नवी मुंबईतील लोकं या ठिकाणी भेट देत आहेत. न्हावा शिवडी सीलिंक झाल्यावर मुंबई आणि राज्यातील लोकं हे उद्यान पहायला येतील याची मला खात्री आहे. दुबई, कॅनडा अशा अनेक देशातील उद्याने आम्ही पाहिली. मात्र दुबईतील मिरॅकल गार्डन पाहिले आणि असेच मिरॅकल घडणारे उद्यान उभारण्याचा संकल्प केला होता. दुबईतील गार्डन वाळवंटात उभारले गेले आहे आणि न्हावेखाडी पट्टा चिखल व पाण्याखाली आहे, त्यामुळे जसे दुबईत मिरॅकल घडले त्याचपद्धतीने आपल्या या ठिकाणीही चिखल व पाण्याखाली गेलेल्या पडीक जागेत मिरॅकल घडले पाहिजे, या उद्देशाने त्या धर्तीवर ‘रामबाग’ उभारले आहे असे सांगतानाच सर्वांचे आभार मानून आपल्या विभागाकरिता हे उद्यान उल्लेखनीय होईल आणि या उद्यानाचा उपयोग लोकांना होईल, याचे मला समाधान आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.