कर्जत : प्रतिनिधी
नेरळ शहर आणि रेल्वे स्थानक येथे येणार्या माथेरान-नेरळ-कळंब या राजमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते धामोते या भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. गेले पाच महिने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र अत्यंत संथगतीने रस्त्याचे काम केले जात असल्याने स्थानिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल आणि रस्त्याच्या दर्जाबद्दल संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असल्याने नेरळ-कळंब ही एसटी सेवा बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. गेली दहा वर्षे खराब रस्त्यातून प्रवास करीत असल्याने चार कोटींचा निधी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर केल्याने नेरळ-कळंब रस्त्यावरून प्रवास करणारे यांना हायसे वाटले होते. 2021मध्ये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिने रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरु केले नव्हते. शेवटी स्थानिकांनी जोरदार आवाज उठविल्याने ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु केले होते. 900 मीटर लांबीचा सिमेंटचा रस्ता आणि तीन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता असे साधारण चार कोटी रुपयांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजूर करून घेण्यात आले होते. मात्र दहिवली पुलापासून पुढे डांबरीकरण करताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरून त्यावर डांबराचा पट्टा मारला आहे. काही ठिकाणी खडीकरण करून रस्ता करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे नित्कृष्ट दर्जाचे डांबर असल्याने रस्ता उखडून गेला होता. याबाबत स्थानिक कार्यकर्ते यशवंत भवारे, केशव तरे, समीर वेहले यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र ठेकेदाराने आपली मनमानी सुरूच ठेवली होती आणि त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागदेखील ठेकेदाराला मदत करण्याचे काम करीत असल्याने स्थानिकांचे कोणी काहीही ऐकले नाही, अशी ग्रामस्थांचीं तक्रार आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरु असताना ज्या भागात 900मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जात होता. या भागात गेले सहा महिने कामे सुरूच आहेत. आता देखील त्या 900मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी जेमतेम 700 मीटर लांबीचा रस्ता इतका बाजूने तर दुसर्या बाजूने 200 मीटरचा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा 900 मीटर लांबीचा रस्ता कधी तयार होणार हा प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अशा कारभाराचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसत आहे. ठेकेदार संथगतीने रस्त्याचे काम करीत असल्याने या भागात चालविली जाणारी एसटी सेवा आज बंद आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने एसटी कामगारांचा संप सुरु झाल्यापासून आणि संप संपल्यानंतर देखील नेरळ-कळंब मार्गावर एसटी गाडी सुरु झाली नाही. या मार्गावर केवळ नेरळ-कळंब ही एसटी गाडी चालविली जात नाही तर नेरळ- ओलमन, नेरळ-बोरगाव, नेरळ-कळंब-कर्जत आणि मुरबाड-नेरळ या गाड्या देखील चालविल्या जातात. एसटी गाड्या बंद असल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ, कामगारवर्ग यांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटीमधून प्रवास करता येत असतो. मात्र सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ जवळ रस्त्याचे काम सुरु आहे.त्यात रस्ता अगदी निमुळता असल्याने गाडी बंद ठेवण्यात आली आहे. त्या भागातून एसटी गाडीमधून प्रवास करणारे प्रवासी यांची संख्या मोठी आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने गाडी सुरु करता येत नाही, ही समस्या आहे.
देवानंद मोरे- सहायक वाहतूक नियंत्रक कर्जत एसटी आगार
या रस्त्यातील सर्वात खराब रस्ता धामोते येथील धनेश्वरी बाग ते नेरळ विद्या भवन तसेच मालेगाव फाटा ते कोदिवले या भागातील रस्ता सर्वात खराब होता. त्याच धनेश्वरी बाग ते नेरळ विद्याभवन या भागातील रस्ता आजही खड्ड्यात आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने डांबर टाकून खड्डे देखील भरले नाहीत. आठ दिवस असेच सुरु राहिल्यास आम्ही सार्व. बांधकाम अधिकारी यांना जाब विचारू.
विष्णू कालेकर- कार्यकर्ते
रस्त्यावर सुरु असलेले काम हे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ठेकेदाराला दिल्या आहेत. मात्र त्या भागात रस्त्यावर असलेली प्रचंड वाहतूक या मुळे गतीने रस्त्याचे काम करता येत नाही. मात्र महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
अक्षय चौधरी-शाखा अभियंता कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग, नेरळ-कळंब
रिक्षा चालक यांना वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे काम अखंडपणे होत नसल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत संशय निर्माण होत आहे. आम्ही या रस्त्यासाठी दोन वेळा उपोषणे केली आहेत. एकदा रास्ता रोकोदेखील केला आहे.
श्रावण जाधव- अध्यक्ष, जय मल्हार रिक्षा संघटना
RamPrahar – The Panvel Daily Paper