पंढरपूर ः प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसत नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया थांबली आहे. या स्थितीत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारफेरीदरम्यान बोलत होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी आवताडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करीत राज्य सरकारवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकारच्या भवितव्यावर पुन्हा एकदा भाष्य केले. ठाकरे सरकार पडणार आहे हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असे विधान पाटील यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाटील यांनी लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले, पण शरद पवार यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केले. वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टी माहीतच नाहीत. स्वत: पीपीई किट घालून फिल्डवर उतरल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.
दरम्यान, अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यात केले होते. या सरकारच्या अन्याय, दुराचार आणि भ्रष्टाचाराला बदलून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळणार आहे. ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता पाटील यांनीही सरकारला सुरुंग लागणार असा दावा केला आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …
RamPrahar – The Panvel Daily Paper