Breaking News

एक्स्प्रेस वेवर गुंडांचा थरार; पोलिसांशी हुज्जत घालून हत्यारे असलेली कार सोडून त्रिकूट फरार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून हत्यारांनी भरलेली कार घेऊन त्रिकुटाने पोलिसांशी हुज्जत घालत पलायन केल्याची घटना घडली आहे. खालापूर पोलीस या तिघांचा कसून शोध घेत आहेत. एका स्विफ्ट कारमधून काही इसम धारदार हत्यारे घेऊन शनिवारी (दि. 17) रात्री एक्स्प्रेस वेवरून पुण्याच्या दिशेने जात होते. कोरोना परिस्थितीमुळे खालापूर टोलनाक्याजवळ वाहन तपासणी सुरू होती. या वेळी पोलिसांंनी या स्विफ्ट कारला अडविले असता, कारमधील तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि ते तेथून पुण्याच्या दिशेने पळून गेले. याबाबतची खबर पुढील बोरघाट महामार्ग पोलिसांना कळवून खालापूर पोलिसांनी ती स्विफ्ट कार पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र खंडाळा घाटातील दस्तुरी बायपास रस्त्यावर ते तिघे कारमधून खाली उतरले व त्यांनी कार 15 ते 20 फूट खाली ढकलून अपघात झाल्याचे चित्र निर्माण केले. त्यानंतर ते बोरघाटातील जंगलात पसार झाले. पोलिसांना या कारमध्ये धारदार हत्यारे व मोबाइल आढळला. गेल्या काही महिन्यांत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्तीच्या दोन-तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हे तीन तरुण गाडीमध्ये हत्यारे घेऊन दरोडा टाकण्यास तर जात नव्हते ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply