अमित मिश्राने घेतली ‘फिरकी’
मुंबई ः प्रतिनिधी
फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबईने 20 षटकांत 9 बाद 137 धावा केल्या होत्या. दिल्लीने 19.1 षटकात चार गडी गमावत हे आव्हान गाठले. चार षटकांत 24 धावा देत चार बळी घेणार्या अमित मिश्राला सामनावीर किताबाने गौरविण्यात आले.
मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसर्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. नवव्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने
त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने पाच चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसर्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने डि कॉकला बाद करीत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने दोन धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी केली. आवेश खानने सूर्यकुमारला 24 धावांवर बाद केले. अर्धशतकाकडे वाटचाल करणार्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. रोहितने तीन षटकार आणि तीन चौकारांसह 44 धावा केल्या.
रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पांड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पांड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26, तर यादवने 23 धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने 15 धावा देत दोन बळी टिपले.
दरम्यान, तब्बल 10 वर्षांनंतर दिल्लीने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्या वेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईत सहा गड्यांनीच मात दिली होती.