मुंबई : प्रतिनिधी
विजय क्लब, उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, ओम् कबड्डी, जय भारत मंडळ, अमरहिंद मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, मावळी मंडळ, सत्यम सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली.
महाराष्ट्र राज्य आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ना. म. जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसर्या दिवशी अंकुर स्पोर्ट्सने इ गटात मावळी मंडळाचा 44-26 असा पाडाव करीत सलग दुसरा विजय मिळवत बाद फेरी गाठली. सुशांत व सुमित या साईल बंधूंच्या भन्नाट चढाया त्याला मिलिंद कोलतेची मिळालेली पकडीची साथ यामुळे अंकुरने मध्यांतराला 22-08 अशी भक्कम आघाडी घेतली होती. मावळी मंडळाच्या राजेश भिलारे, निशिकांत पाटील यांना उत्तरार्धात सूर सापडला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
ग गटात गोलफादेवीने श्री हनुमानचा 31-27 असा पाडाव केला. विश्रांतीपर्यंत 13-14 अशा एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या गोलफादेवीच्या अक्षय बिडू, दुर्वेश पाटील, अनिकेत डावरे यांनी उत्तरार्धात आपला खेळ अधिक गतिमान करीत हा विजय साकारला. सतेज शेडगे, संदीप हरडे यांचा खेळ श्री हनुमानला विजयी करण्यास कमी पडला.
फ गटात छत्रपती शिवाजीने शिवशक्तीला 36-22 असे नमवित बाद फेरी गाठली. अर्जुन शिंदे, शुभम शिर्के या विजयात चमकले. मकरंद मसुरकर, विराज सोहनी शिवशक्तीकडून बरे खेळले.
क गटात गुड मॉर्निंगने धीरज रोकडे, सुदेश कुळे, अजय शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ओम कबड्डी संघाचा 31-16 असा पाडाव करीत या गटात अग्रक्रम पटकाविला. ओम कबड्डी संघाने वीर परशुरामचा 36-19 असा पराभव करीत या गटात दुसरे स्थान प्राप्त केले. अक्षय भोपी, राहुल भोसले या विजयाचे शिल्पकार ठरले. आयत्या वेळी जय शिव-बदलापूर या संघ न आल्यामुळे संधी मिळालेल्या अमरहिंदने नवजवानवर 30-20 अशी मात करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. विश्रांतीपर्यंत 10-10 अशा समान गुणांवर असलेल्या या सामन्यात अमरहिंदच्या निशांत देवकर, निलेश सकपाळ यांनी टॉप गियर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला.