श्रीवर्धन : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावरती असल्याचे पाहायला मिळत आहे. सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे श्रीवर्धन तालुक्यातील बुरूड व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरुड समाजाने वीणलेल्या टोपल्या, परड्या, रोवळ्या, सुपे, कोंबड्यांचे खुराडे, भाताचे कणगे याला मोठी मागणी असते. रोवळीचा उपयोग प्रामुख्याने लग्न समारंभामध्ये तांदूळ धुण्यासाठी केला जातो. लग्न मंडपामध्ये लावलेला दिवा विझू नये म्हणून, तो रोवळीमध्ये ठेवण्याची प्रथा आहे. सुपाचा वापर नेहमी घरात तांदूळ किंवा कोणतेही धान्य पाखडण्यासाठी केला जातो. गौरी-गणपतीच्या सणामध्ये सूपांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. भात वारवण्यासाठी सुपाचा वापर केला जातो. मळणी काढल्यानंतर भात वीणलेल्या कणग्यामध्ये ठेवतात. टोपल्या, परड्या इत्यादीचा उपयोग आपल्या घरात नेहमीच होत असतो. मात्र आजमितीला श्रीवर्धन तालुक्यातील बुरुड समाजासमोर मोठा प्रश्न आहे, तो बांबूंच्या तुटवड्याचा. लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभ, पारंपरिक सण, उत्सव साजरे करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आली आहे. त्यामुळे वीणलेल्या मालाला खप नसल्यानेे श्रीवर्धन तालुक्यातील बुरुड व्यवसाय धोक्यात आला आहे.