‘दिबां’चे नाव डावलल्याने प्रकल्पग्रस्त नाराज
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. हा प्रस्ताव म्हणजे प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक लढे दिले, आंदोलने केली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी यासाठी वाहिले आणि अखेरच्या क्षणापर्यंत ते योगदान देत राहिले. त्यामुळे त्यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देणे उचित व आवश्यक असताना आणि तशी स्थानिकांची आग्रही मागणी असतानादेखील सिडकोने विमानतळाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नामकरणावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
सिडको महामंडळ हे राज्य शासनाच्या अखत्यारित येते. त्यामुळे या निषेधाचे अधिक पात्र राज्य सरकार असल्याचे मत स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यक्त करू लागले आहेत. कोरोनामुळे लोक सध्या त्रस्त आहेत आणि याकरिता सरकारी यंत्रणा अपुरी पडत असताना नामकरणाचा वादाचा विषय काढून राज्य सरकारला काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. नामकरणाचा हा विषय पेटण्याची चिन्हे आहेत.