Breaking News

कडक निर्बंधांमुळे आंबाविके्रत्या व्यापार्यांचे नुकसान

हापूसचे दर गडगडले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्यात लागू असणार्‍या कडक निर्बंधांचा फटका आंबाविक्रीला झालेला आहे. व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या दरात प्रचंड घसरण होत असल्याने कोकणातील हापूस उत्पादक शेतकर्‍यांचे दिवसागणिक सुमारे 50 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकरी, तसेच आंबाविक्री करणारे व्यापारी यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हापूस आंब्याची विक्री करण्यास वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात आंबाविक्री करणार्‍या घाऊक व्यापार्‍यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिलपासून राज्यात लॉकडाउन लागू केला. या दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू व फळविक्री सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.

किरकोळ विक्रीसाठी आंबा खरेदी करणार्‍या विक्रेत्यांकडून आंब्याची विक्री होत नसल्याने त्याचा परिणामदेखील हापूस आंब्याच्या विक्रीवर झाला आहे. आंब्याची चढ-उतार करणारे कामगार, माथाडी यांना रेल्वेप्रवास बंदी असल्याने त्याचा फटकाही बसला आहे.

गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे, हापूस आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. चालू हंगामातदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘विक्रीची वेळ वाढवून द्या’

राज्य सरकारने ’ब्रेक द चेन’दरम्यान अन्य फळांच्या विक्रीस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी दिली. त्याच धर्तीवर हापूस विक्री करण्यास वेळ वाढवून द्यावी. हापूस आंबा विक्रीची वेळ वाढविण्यास सरकारने उशीर केल्यास, कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडेल, अशी खंत व्यक्त आणि मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे हापूस आंब्याचे व्यापारी अशोक हांडे यांनी सांगितले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply