Breaking News

हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर

कर्जत शहरात असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून या 150 वर्षाचा इतिहास असलेल्या मैदानाला आता बिल्डरचा वेढा पडत आहे. त्यामुळे हे व्यायाम मंदिर वाचवावे, अशी भूमिका कर्जत शहरातील नागरिकांनी आणि या व्यायाम मंदिरात येऊन आपले शरीर बनविणार्‍या बुजुर्ग मंडळींनी आता लढा पुकारला आहे.

कर्जत येथील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर व त्याजवळील मैदान हा कर्जत तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. कारण तब्बल 140 वर्षे हे व्यायाम मंडळ कोणत्याही राजकीय आशीर्वादाविना उभे आहे. आज कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या व्यायाम शाळा म्हणजे हल्लीच्या भाषेत जिम उभ्या आहेत. तेथे जाणारे तरुण महिन्याला हजारात पैसे मोजून आपली शरीरयष्टी बनविण्यासाठी झटत असतात, पण कर्जत येथील भगवान टॉकीजच्या बाजूला म्हणजे नंतरच्या काळात अलंकार टॉकीज आणि आताच्या राजनोव्हा या थिएटरच्या बाजूला असलेल्या हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराने आपले सर्व योगदान जुन्या पिढीला दिले आहे. त्यामुळे कर्जतकर आज हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराच्या पडिक होत असलेल्या वास्तूबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत, परंतु त्याच्याशी आत्मियता नसलेल्या काही व्यवसायिक बिल्डर धार्जिण्या  प्रवृत्तीची त्या मैदानावर वाईट नजर पडली आहे. ही बाब जेव्हा कर्जतकरांच्या लक्षात आली तेव्हा व्यायाम मंदिर आणि समोरील खुले मैदान वाचविण्यासाठी कर्जतकरांनी लढा हाती घेतला आहे.

हुतात्मा भाई कोतवाल हे कर्जत तालुक्यातील अग्रणी क्रांतिकारक होते व त्यांनी वयाच्या 31व्या वर्षी आपले बलिदान समाजासाठी दिले आहे. कोतवाल मैदानाच्या जागी ब्रिटिश काळात टेनिस कोर्ट होते. नंतर ते टेनिस कोर्ट बंद पडल्याने त्या जागेवर लोकल बोर्ड (सध्याची पंचायत समिती) यांनी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर भाई कोतवालांच्या जयंती निमित्ताने बांधून दिले असा इतिहास आहे. गावातील अनेक कार्यक्रम जुन्या काळात तिथे होत असत. 60च्या दशकात नंतर या मैदानावर व व्यायामशाळेवर संस्थेच्या कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. सदर मंडळ हे कै.एकनाथ हनुमंते व श्रीयुत सुधाकर भूतकर यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रजिस्टर्ड केले, परंतु त्याआधी देखील मैदानाला 150 वर्षांचा इतिहास असून सदर मैदानात स्वातंत्र्यापासून ही व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा ही सुस्थितीत आहे, परंतु शहराच्या मध्यभागी असलेल्या व्यायाम मंदिराच्या जागेवर डोळा ठेवून असलेल्या बिल्डर लॉबीने आपले हात पसरविण्यास सुरुवात केली आहे. सदर जागा ताब्यात मिळावी यासाठी खोटी कागदपत्रे गोळा केली जात आहेत, त्याच वेळी व्यायाम मंदिर बंद असल्याचे कारण पुढे करून बिल्डर लॉबी जागा बळकवण्यासाठी पुढे येताना दिसत आहे. त्यातील काही लोकांना हाताशी धरून कर्जत नगर परिषदेमधील बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍याला हाताशी धरून ही मालमत्ता पाडायचे ठरवले होते.  त्याला हरकत अर्ज करून काही काळ स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती किती दिवस राहील हे कोणालाही माहिती नाही, परंतु जागा बळकावून त्या ठिकाणी टॉवर उभारण्याचे स्वप्न उरी बाळगलेली बिल्डर लॉबी यांच्याशी ही स्थानिकांची लढाई आहे. त्यामुळे या व्यायामशाळेत घडलेल्या आणि व्यायामशाळेबद्दल आपुलकी असलेली मंडळी पुढे आली आहेत. त्यांनी सह्यांची मोहीम हाती घेऊन हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर वाचविण्यासाठी हाती घेतलेला लढा हा कर्जतसाठी अस्मितेचा लढा बनला आहे.

कर्जत तालुक्यातील अनेकांनी कोतवाल व्यायामशाळेत व्यायाम केला असून त्या ठिकाणी शरीर कमावले आहे. कै. लक्ष्मणराव कोकजे यांनी तिथे सुमारे 30 वर्ष व्यायाम केला आहे.अनेक वर्षे त्या व्यायामशाळेचा ताबा हा कोकजे कुटुंबीय यांच्याकडे होता. गावातील जुनी जाणती मंडळी तिथे कार्यकारी मंडळावर होती. लक्ष्मणराव कोकजे हे राष्ट्रीय वेटलिफ्टर होते, परंतु गावातील तहहयात सभासदांना देखील या मैदानाचा विकास प्रकल्प करताना विचारलेले नाही. काही दिवसांपूर्वी एका जागरूक नागरिकाने निनावी पत्र याबाबत अनेक नगरसेवक व पत्रकार यांना पाठवले असून या मैदानाच्या जागी असलेली व्यायामशाळा पाडून तिथे इमारत प्रकल्प सुरू होणार आहे असे त्याद्वारे लोकांना समजले. कर्जतमधील जाणत्या नागरिकांनी याबाबत बचाव समिती गठीत केली असून क्रांतिकारक हुतात्मा कोतवाल यांच्या नावे असलेली व्यायामशाळा कोणत्याही परिस्थितीत पाडू द्यायची नाही व ऐतिहासिक मैदान भविष्यातील पुढील पिढीसाठी व क्रीडा प्रेमींसाठी वाचवायचे असा निर्धार समितीने केला आहे. आता एक समिती आणि जागरूक नागरिक बिल्डर लॉबीचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी पुढे आली आहे. त्याच वेळी या बिल्डर लॉबीला मदत करणारे कर्जत नगरपालिकेच्या प्रशासनातील काही कर्मचारी यांनादेखील धडा शिकविण्याची तयारी नागरिकांची समिती करणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात असून कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर वाचविले पाहिजे यासाठी सर्व आघाडीवर आहेत.

सध्याचे मैदान हे संस्थेस 1966 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून वापरासाठी देण्यात आले होते. नाममात्र एक रुपये लीजवर भाड्याने मिळाले असून या व्यायामशाळेचा आणि मैदानाचा वापर अन्य कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी अद्याप कोणीही केला नाही. त्यामुळे याबाबत हे मैदान व जागा फक्त व्यायामासाठी असावी, असा यात उद्देश होता. मैदानाच्या जागी इमारत करणे व त्यात गाळे बांधणे वा इमारत बांधणे याबाबत देखील कोणतेही प्रयोजन त्या काळी संस्थेच्या घटनेत केलेले नाही. असे असताना संस्थेच्या तथाकथित पदाधिकारी यांनी त्या मैदानाची तहसील कार्यालयातील महसुली अधिकारी वर्गाला हाताशी धरून लाखो रुपये किंमत स्वतःच्या खिशातून भरली आहे. याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत कुठेही गावातील नागरिकांना कळवले का नाही? यामुळे या मैदानाचा इमारत बांधून पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बचाव समितीने परखड भूमिका घेतली असून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयास हरकती उपस्थित केल्या आहेत. कर्जत नगर परिषदचे जागरूक मुख्याधिकारी यांनी याची दखल घेऊन बांधकाम पाडण्यास स्थगिती दिली असून पुढील कागदपत्र व स्पष्टीकरण मागवले आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील याबाबत समितीला सहकार्य केले असून समितीने कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मैदान व सुस्थितीत असलेली व्यायामशाळा वाचवायचा निर्धार केला आहे.

या ठिकानी संभाव्य होणार्‍या इमारत विकास प्रकल्पाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास असून कर्जतकर जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी असे प्रकल्प झाल्यास होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी कर्जत नगर परिषद यांच्या बांधकाम विभागाची व तहसील कार्यालयाची राहील. कर्जतचा ऐतिहासिक ठेवा आम्ही मिटू देणार नाही. क्रांतिकारकांच्या नावाने सुरू झालेल्या व्यायामशाळा पाडण्याचा व त्यांचे कार्य समाजातून नाहीसे करण्याचा घाट घालण्याचा व ऐतिहासिक मैदान गिळंकृत करण्यास पाठबळ देण्याचा अधिकार कर्जत नगर परिषदमधील भ्रष्ट बांधकाम कर्मचारी व तहसील कार्यालय यांना कोणी दिला आहे?

हुतात्मा कोतवाल मैदान वाचले पाहिजे व त्या जागी असलेली व्यायामशाळा डागडुजी करून सुरक्षित राहिली पाहिजे. यासाठी सर्व कर्जतकर नागरिकांनी धर्मदाय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच कर्जत नगर परिषद यांच्याकडे तातडीने हरकती उपस्थित कराव्यात व समितीच्या लढ्यास सढळ हस्ते सहकार्य करावे.अजूनही क्रांतीची मशाल रोमारोमात तेवत आहे. वीर भाई कोतवाल हे नाव आसमंतात अखंड निनादत आहे. त्या वेळी फितुरांच्या प्रवृत्तीने सिद्धगडचे रान दाखवले आहे. या वेळी भाईंच्या नावाचे मैदान दाखवले आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

रोख्यांचा रोख कोणाकडे?

निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांना ज्या काही आर्थिक कसरती कराव्या लागतात, त्यातूनच काळ्या पैशाचा महापूर येतो. …

Leave a Reply