अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जवळपास सहा महिने रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद होता. सप्टेंबरनंतर हळूहळू निर्बंध शिथिल होत गेले तसा पर्यटकांचा ओघ वाढू लागला. नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांत पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत होते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आर्थिक कोंडीतून पर्यटन व्यावसायिक सावरू लागले होते, पण पुन्हा निर्बंध घालण्यात आल्यामुळे पर्यटक येत नाहीत. परिणामी पर्यटन व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.