हैदराबाद ः वृत्तसंस्था
आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी कोरोनाच्या दुसर्या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी 30 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. सन टीव्ही हे हैदराबाद संघाचे मालक असून, त्यांनी केलेली मदत सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत देणग्यांमधील ही सर्वांत मोठी देणगी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा 14वा हंगाम स्थगित करण्यात आला. सनरायझर्स हैदराबाद संघातील यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहालाही कोरोना झाला. त्यानंतर लीग तहकूब झाली. यंदाच्या हंगामात हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नाही. गुणतालिकेत ते सातपैकी सहा पराभवांसह शेवटच्या स्थानी होते. यंदाच्या आयपीएल हंगामात एकूण 29 सामने खेळले गेले. आता बीसीसीआय उर्वरित सामने इतरत्र आयोजित करण्यासाठी विंडो शोधत आहे. दरम्यान, प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. मागील हंगामात हैदराबाद संघाने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता.