छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य
पनवेल : वार्ताहर
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या अक्षय तृतीया या शुभदिनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आला होता. कोरोनामुळे दुग्धशर्करा योगाचा आनंद लुटता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना विषाणूच्या संक्रमणाचे भान सुटता कामा नये. या भूमिकेतून पनवेलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निर्जंतुक द्रव्यांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विनोद साबळे आणि करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 14 मे रोजी करंजाडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सोडियम हायपोक्लोराइड या निर्जंतुक द्रव्यांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला. या वेळी आपली भूमिका मांडताना विनोद साबळे म्हणाले की, आपले आदर्श असणार्या राष्ट्रसंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथीसारखे कार्यक्रम साजरे करत असताना आज समाजावर ओढवलेली परिस्थिती ही नक्कीच ध्यानात घेतली पाहिजे. म्हणूनच आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आम्ही ती सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करण्याचे ठरविले.
कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूपात आपल्यावर आघात करत आहे. त्यामुळे कोरोना निर्मूलनाच्या त्रिसूत्री पैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणे या सूत्राची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरविले. कोरोना विषाणूच्या निर्बंधांच्या निकषांचे तंतोतंत पालन करत हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यानिमित्ताने करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील सोसायटी, रस्ते, वस्त्या याठिकाणी निर्जंतुक द्रव्य फवारले जाणार आहे ही समाधानाची बाब आहे.