
बारामती/सुपे ः प्रतिनिधी
बारामतीकरांनी सत्तेत असताना शेतीचे सिंचन करण्याऐवजी स्वतःच्या तिजोरीचेच सिंचन केले. परिणामी, जल मिळण्याऐवजी बारामतीच्या जिरायती भागाच्या नशिबी मृगजळ आले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा, पाणी देतो, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले.
महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अन्य या वेळी उपस्थित होते.
-अजित पवारांना आव्हान
आ. अजित पवार यांना आव्हान देताना मुख्यमंत्री म्हणाले, पवार पालकमंत्री असताना 15 वर्षांत त्यांनी 389 कोटी निधी जिल्ह्याला दिला. आम्ही पाच वर्षांत 2090 कोटी रुपयांची मदत दिली आहे. सिंचन क्षेत्रात भ्रष्टाचार करत त्यांनी तिजोर्यांचे सिंचन केले. स्वातंत्र्यापासून 32 लाख हेक्टर असणारी सिंचन क्षमता आम्ही पाच वर्षांत 40 लाख हेक्टरवर नेली. सिंचनाच्या कमी दराच्या निविदा स्वीकारत, त्यातून शासनाचे 400 कोटी रुपये वाचविले.
शरद पवार राज्यसभेवर असल्याने वाचले; परंतु त्यांच्या घरातील कोणीही आता लोकसभेत जाणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. मतदारांशी मी बोललो, तर पवारांवर सूड उगवण्याची नामी संधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणत आहेत, असेही ते म्हणाले. पार्थ हरल्यावर अजित पवार घरी तरी जाऊ शकतील का, असा सवाल त्यांनी केला.
– किती पिढ्या निवडणुकीत?
आणखी किती पिढ्या निवडणुकीत उतरवता, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, आजोबाला पंतप्रधान, दादांना मुख्यमंत्री, ताईंना केंद्रात मंत्री व्हायचेय, पार्थला खासदार, तर आणखी एकाला आमदार व्हायचे आहे, मग कार्यकर्ते काय आयुष्यभर सतरंजाच उचलणार का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
– मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे पवारांवर त्यांच्याच मतदारसंघात जोरदार हल्ला चढविल्याने भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. या वेळी बारामतीचीही जागा आम्ही जिंकूच, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेकदा केलेला आहे. त्यादृष्टीने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. आता अमित शाहा यांची सभा होईल.
– राष्ट्रवादी ही पराजित टीम असून, पवार प्रत्येक निवडणुकीत इथे पाण्याचे आश्वासन देऊन मते मिळवितात; परंतु तो जमाना आता गेला आहे. आजवर या भागाला पाणी का दिले नाही, असा सवाल करत या भागाला पाणी आणण्यासाठीची ही निर्णायक निवडणूक आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री