प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
आणीबाणीच्या काळात अनेक गोष्टींवर सरकारने निर्बंध घातले. स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली गेली. त्यामुळे सर्वत्र सरकारच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लोक मोकळेपणाने बोलायला घाबरत. त्यांचा हा संताप अनावर होत होता.
आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या विरोधकांना खूप त्रास सहन करावा लागला. सहा महिन्यांनंतर सरकारने दि. बा. पाटील यांना सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्या अगोदर त्यांच्याकडून यापुढे आंदोलनात कधीही भाग घेणार नाही, असे हमीपत्र लिहून घ्यायचे ठरले. ‘दिबां’नी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. जनतेच्या प्रश्नांसाठी ज्या ज्या वेळी आंदोलन करण्याची वेळ येईल, त्या वेळी मी आंदोलन करेन, असे त्यांनी सरकारला खडसावून सांगितले. शेवटी सरकार नमले आणि ‘दिबां’ची बिनशर्त सुटका झाली. ही बातमी कळताच पनवेल, उरणमध्ये जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साह इतका होता की आणीबाणीच्या दहशतीची पर्वा न करता ‘दिबां’च्या स्वागतासाठी ते हजारोंच्या संख्येने पनवेलमध्ये जमले होते.
पुढे आणीबाणीचा काळ संपला आणि 1977 साली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. आणीबाणीत लादलेल्या निर्बंधांमुळे लोक वैतागले होते. सरकारविरोधातील हा राग व्यक्त करण्याची एक नामी संधी त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली होती.
कुलाबा जिल्हा हा लोकसभेचा एक मतदारसंघ होता. ‘दिबां’चा नावलौकिक सार्या जिल्हाभर पसरला होता. साहजिकच या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाचा आग्रह धरला. शेवटी शेकापने त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्या वेळी त्यांचे मोठे बंधू आजारी होते. ‘दिबां’ची त्यांच्यावर खूप श्रद्धा होती. बंधूंना ही बातमी ऐकून आनंद झाला, पण ‘दिबां’चे यश पाहायला ते या जगात नव्हते.
लोकसभेची ही निवडणूक देशात आणीबाणीच्या प्रश्नावरच लढली गेली. आणीबाणीची झळ ज्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावी लागली ते सारे पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी 23 जानेवारी 1977 रोजी जनता पक्षाची स्थापना करून देशात सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध मोठी प्रचार मोहीम सुरू केली.
आणीबाणीच्या काळात ‘दिबां’नी स्वतः तुरुंगवास भोगला असल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कारभारावर ते जोरदार टीका करीत. शेकापचे अनेक ज्येष्ठ नेते ‘दिबां’च्या प्रचारासाठी या निवडणुकीत उतरले होते. गावोगावच्या सभा गाजवत होते. कुलाबा जिल्हा हा आजवर लोकसभेसाठी काँग्रेसचा पारंपरिक विजयी मतदारसंघ होता, पण या वेळची परिस्थिती मात्र वेगळी होती. आणीबाणीमुळे लोक काँग्रेसच्या विरोधात गेले होते. केंद्रात सत्ताबदल झालाच पाहिजे असे सर्वांना वाटत होते. त्याचाच फायदा विरोधक उठवत होते.
चार वेळा आमदार झालेल्या ‘दिबां’ना या सार्या जनमताची कल्पना होती. तरीदेखील लोकसभेच्या मतदारसंघाची व्याप्ती पाहता प्रचाराच्या नियोजनात कुठेही त्रुटी राहू नयेत याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. विधानसभा मतदारसंघापेक्षा लोकसभेचा हा मतदारसंघ कितीतरी पटीने मोठा आहे व या मतदारसंघात असलेल्या एकूण पाच लाख 87 हजार 580 मतदारांपर्यंत आपल्याला कसे पोहचता येईल याचाच ते सतत विचार करीत. ‘दिबां’नी आपल्या अनेक ज्येष्ठ सहकार्यांसह हा सारा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. मतदारांना आपली भूमिका पटवून दिली. त्यामुळे त्याचा योग्य तो परिणाम निवडणुकीच्या दिवशी दिसून आला.
लोकांनी ‘दिबां’ना भरभरून मते दिली. या निवडणुकीत त्यांना एक लाख 99 हजार 463 इतकी भरघोस मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार शंकर सावंत यांना एक लाख 46 हजार 142 मतांवर समाधान मानावे लागले. ‘दिबा’ या निवडणुकीत 53 हजार 321 मतांची आघाडी घेऊन निवडून आले. त्यांनी कुलाबा जिल्ह्यातील आजवरची काँग्रेसची विजयाची परंपरा खंडित केली.
देशातही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्याचे एकमेव कारण म्हणजे आणीबाणीने निर्माण केलेली परिस्थिती. कुलाबा मतदारसंघात दि. बा. पाटील यांनी मिळविलेल्या विजयामुळे शेकापही आता दिल्लीत पोहचला. इंदिराजींच्या पराभवामुळे दिल्लीचे राजकारण बदलले होते. जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने मोरारजी देसाई यांचे जनता सरकार केंद्रात सत्तेवर आले. ‘दिबां’ची तोफ आता लोकसभेत धडधडणार होती.
-दीपक रा. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार