


राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली. हे निवारा शेड विशेषतः शहरी भागात प्रथमतः उभारण्यात येऊन काही प्रमाणात ग्रामीण भागातही मार्गाच्या दुतर्फा उभारण्यात आले. या बस स्थानकांमध्ये प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव होत असतानाच त्यांच्या संपत्तीचेही रक्षण होत असते. काही निवारा शेडचा वापर होत नसल्याने हेच प्रवासी थांबे भूत बंगला ठरत आहेत. अशी बसस्थानके भिकारी, मनोरुग्ण किंवा गुराढोरांच्या निवार्याचे हक्काचे स्थान ठरत आहेत.
काही शहरांतील निवारा शेड सध्या हरवले असून त्याच्या शोधात प्रवासी आहेत. 50-60 वर्षांपूर्वी लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे गर्दी कमी होती. शहरातील बाजारपेठेत वाहनांची संख्या कमी असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बाजारपेठेतून जात असताना प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आली होती.
कालांतराने शहरी लोकसंख्याही वाढली तशीच वाहनांची संख्याही वाढल्याने बाजारपेठेतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अडथळा ठरू लागल्या. कित्येकदा तर बसचालकांना शाब्दिक चकमक किंवा शारीरिक इजा करण्याच्या, मारहाण होण्याच्या घटना घडू लागल्या. अशा घटना वारंवार होत असल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रवासी वाहतूक करणारी बस
बाजारपेठेतून, गर्दीतून नेण्यास कर्मचारी संघटनांनी नकार दिला आणि गावाच्या बाहेरून बस धावू लागल्या, मात्र प्रवासी निवारा शेड तसेच पडून राहिल्याने त्याचा वापर अतिक्रमण करून खासगी गाळेधारकांनी ताब्यात घेतले.
कल्याण-डोंबिवलीतील मुख्य मार्गावर असणारी जुनी बस निवारा शेड रातोरात जमीनदोस्त करण्यात येत आहेत. टिळक चौकातील बस थांबा खासगी विकासकाकडून संगनमताने गायब करण्यात आला होता, मात्र जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा थांबा काही अंतरावर पुन्हा उभारण्यात आला आहे. कल्याण परिवहन सेवेचे कल्याण-मुरबाड मार्गावरील दोन बसस्थानके चोरीला गेल्याची तक्रार जुलै 2019मध्ये सामाजिक कार्यकर्त्याने कल्याणच्या महात्मा गांधी पोलीस स्थानकात दाखल केली आहे. गर्दीच्या ठिकाणी असणारी ही स्थानके खासगी विकासकाने रातोरात गायब केली होती. प्रवाशांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेली बसस्थानके इमारती, दुकानाच्या समोर किंवा बँकेच्या समोर असेल, तर मोक्याची जागा हेरून ही स्थानके गायब केली जात आहेत. शीव-पनवेल महामार्गाचे काम सुरू असताना प्रवासी निवारा शेडची मोडतोड करण्यात येऊन नव्याने ही बस थांबा, निवारा शेड बांधण्यात आली. प्रत्येकी पाच लाख रुपये खर्चाची 16 निवारा शेड उभारण्यात आली होती.ती काही महिन्यांतच मोडकळीस आली आहेत. संभाजीनगर,
औरंगाबादसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी 27 मार्गांवर तब्बल 257 थांबे निर्माण करण्यात आले आहेत, तर शहरात 150 बस थांबे उभारण्यात आले आहेत. शहर परिवहन सेवा सुरू होत असताना पहिल्या टप्प्यात 25 बसेस दाखल होत आहेत.
तालुक्यातील जुने बसस्थानक व्यापार्यांच्या घशात
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरणाबरोबरच शहरीकरणाची वाढ झाली. या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली. वाहनांच्या संख्येने शहरातील बाजारपेठेत जाणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने कोंडू लागले आणि या कोंडीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणार्या राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी वाहतूक करणार्या बसेस बाजारपेठेत न जाता शहराच्या बाहेर थांबू लागल्या. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने बांधलेली बसस्थानके, निवारा शेड व त्यासाठी वापरण्यात आलेली जागा त्याच ठिकाणी राहत तिचा वापर अनधिकृतपणे अतिक्रमण करून व्यापार्यांनी ताब्यात घेतली. आज जिल्ह्यातील मोठमोठ्या शहरांत जागेचे भाव गगनाला भिडले असताना मोक्याच्या ठिकाणी असणारी जागा करोडोंची संपत्ती आहे, मात्र या जागेकडे राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करून ही जागा ताब्यात घेण्यासाठी कोणतीही हालचाल करीत नसल्याने अतिक्रमण करणार्यांचे फावले आहे.
1980च्या दशकात खोपोली बाजारात राज्य परिवहन महामंडळाची बससेवा खालापूर तालुक्यासह कर्जत, पेण, पाली, सुधागड अलिबाग अशा ठिकाणी सुरू असताना खोपोली बाजारपेठेतील रेल्वे स्टेशन मार्गासमोर असणारी प्रवासी निवारा शेड बससेवा बाजारातून बंद झाल्याने कित्येक वर्षे पडून आहे. लाखो-करोडो रुपये किमतीच्या जागेचे काय झाले याबाबत पेण अभियांत्रिकी विभागाचे सोनार यांनाही माहिती नाही.
2019च्या एप्रिलमध्ये त्यांची भेट घेतली असता सत्य समोर आले. जागेबाबत सोडा पण एसटी महामंडळाची बस खोपोली बाजारमधून जात होती याची माहिती नसल्याचे उघड झाले होते. अशीच अवस्था खालापुरातील इतर बस स्थानकांची आहे. खालापूर गावातील बसस्थानक काही वर्षांपूर्वी हरवले आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारून काही मोकळी जागा प्रवासी निवार्याच्या नावावर असल्याची बतावणी करण्यात येते, मात्र या स्थानकात सोयीसुविधा नाहीत. पंखे नाहीत, तर शौचालय किंवा मुतारी यांचा पत्ता नाही. खालापुरातील खोपोली-पाली मार्गावरील पाली फाट्यावरील निवारा शेड गाळेधारकांनी कोंडून घेतले आहे. निवारा शेड कुठे आहे याचा प्रवाशांना शोध घ्यावा लागत आहे, तर स्थानिक आमदार फंडातून तालुक्यात बांधलेली
बसस्थानके काही वर्षांतच शेवटची घटका मोजत आहेत. खोपोलीची जी अवस्था तीच कर्जतमधील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकांच्या जागेची असल्याचे नागरिकांचे मत आहे. चौकमध्ये 40 वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबांची दोन रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर असणारी जागा एसटी महामंडळाच्या पेण विभागातील अधिकार्यांनी शुक्रवारी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली व मूळ मालकाच्या ताब्यात दिली.
वरिष्ठांच्या आदेशाने अशी कारवाई केल्याचे पेण अभियांत्रिकी विभागाचे सोनार यांचे म्हणणे आहे, तर मूळ मालक असणारे राजू ठाकरे व विजय ठाकरे यांचे म्हणणे आहे की, एसटी महामंडळाच्या चौकमधून जाणार्या बसेस वाहतुकीच्या खोळंब्याने पूर्वी बाहेरून काढण्यात आल्या. याचा तोटा शाळकरी मुले, वृद्ध प्रवासी यांच्याबरोबरच सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे, मात्र चौक गावातील मुख्य बाजारपेठेत असणार्या निवारा शेडच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापार केला जात असल्याने भाडेतत्त्वावरील ही जागा आम्हाला परत मिळावी, अशी मागणी केली होती. महामंडळाने कायदेशीर पूर्तता करून मूळ जागा आमच्या ताब्यात दिली आहे, मात्र या जागेचा समाजाच्या हितासाठी वापर होत असेल, तर आम्ही ती जागा पुन्हा देण्यास तयार आहोत, परंतु आमच्या जागेवर इतर कोणी अतिक्रमण करून पैसे कमावत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही, असे सांगत राजू व विजय ठाकरे यांनी ठाकरे नावाला जागल्याची चर्चा रायगडात सुरू आहे.
-अरूण नलावडे, फिरस्ती
RamPrahar – The Panvel Daily Paper