पनवेल : वार्ताहर
प्रेमभंग झालेल्या उच्चोशिक्षित युवतीस लाखो रुपयाला गंडा घालणार्या एका भोंदू बंगाली बाबास गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)ने गजाआड केले आहे.
खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे युवती फेब्रुवारी 2021मध्ये प्रेमभंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने डिप्रेशनमध्ये गेली होती. ही युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तिने बाबा बंगालीची प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय अशी जाहिरात पाहून त्यावर संपर्क केला. या वेळी बाबा कबिर खान बंगालीने मेरठ येथील दर्ग्यामध्ये युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादू करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असे सांगून वेळोवेळी युवतीकडून पूजा विधिसांठी लागणार खर्च म्हणून चार लाख 57 हजार रुपये घेतले.
सर्व करूनदेखील काहीच फरक पडत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने खारघर पोलिसांत बाबा बंगालीविषयी तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याचा शोध घेताना मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी रविवारी (दि. 11) ठाणे येथील मिरा रोडच्या गोविंदनगर येथे येणार असल्याने पोलिसांनी आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली (वय 33, गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे, मूळ रा. लिसाळी रोड, मेरठ, उत्तर प्रदेश) यास शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच आरोपीचे मोबाइलच्या गुगल पे अकाऊंटवर पिडीत मुलीने पाठविलेल्या पैशांचा तपशिलदेखील आहे. फसवणूक झालेल्या मुलीने आरोपीस पाहिलेले नसतानाही व वारंवार मोबाइल व राहाण्याचे ठिकाण बदलत असताना कौशल्यपुर्ण तपास करून पोलिसांनी गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपीने अशा अनेक लोकांना फसवले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीने कोणास फसविले असल्यास त्यांनी गुन्हे शाखा व खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.