महाड : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि व्यापार्यांच्या दुकानांत पाणी शिरले. बचाव पथकाने अनेकांचे सरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.
महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला. त्यातच महाबळेश्वर येथील मुसळधार पावसाचे पाणी सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले. गांधारी आणि काळ नद्याही ओसंडून वाहू लागल्या. त्यामुळे शहराच्या पूरस्थितीत वाढ झाली. पाणी शिरल्याने अनेक गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क तुटला. ग्रामीण भागालाही पावसाचा फटका बसला. नाते, बिरवाडी भागातही पुराचे पाणी साचले, तर शेते पाण्याखाली गेली होती.
दरम्यान, पूर बघण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या संजय नरखेडे (वय 50) यांचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. महाड शहरातील एका इमारतीत ही दुर्घटना घडली, तर दासगावमध्ये एका घरात पाणी शिरल्याने सहा ते सात जण अडकून पडले होते. त्यांना बचाव पथकाने बाहेर काढले.
Check Also
पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …