Breaking News

देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र कळंबोलीत उभारले जाणार -मंत्री उदय सामंत

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी 
जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने या वर्षी 26 कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी 36 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल 1700 कोटी खर्चून देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीत उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून पनवेल परिसराचा विकास शासन करीत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि.14) केले. ते पनवेल महापालिकेच्या वतीने कळंबोली येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह व विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश बालदी, आमदार राम शिंदे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पनवेलमध्ये या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून पनवेलच्या विकासाची सुरुवात झाली आहे. पनवेल परिसरातील प्रलंबित प्रश्न शासन सोडवत आहे. येत्या काळात पनवेल महापालिका विकासात्मकदृष्ट्या सुदृढ होईल.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सर्वांच्या दृष्टिकोनातून आजचा हा सोहळा आनंदाचा आणि अभिमानचा आहे. माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांचे विशेष अभिनंदन करतो, कारण त्यांनी सभापती झाल्यापासून कळंबोलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाचे भवन उभे राहिले पाहिजे यासाठी सतत पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास होत आहे त्याचेच प्रतिबिंब पनवेल महापालिका हद्दीत पहायला मिळत आहे. या महापालिकेत एकाच वेळी 650 कोटी रुपयांची कामे सुरू होत आहेत. यामध्ये कळंबोली, खारघर व पनवेलबरोबरच ग्रामीण भागातील कामे आहेत. गटार लाईन, पिण्याचे पाण्याच्या योजना आहेत. महापालिका ज्यांच्यामुळे बनली ते भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे या महापालिकेचा जन्म झाला आणि ती आता वेगाने धावायला लागली आहे.
पनवेल महापालिकेला जगाच्या नकाशावर आणायचे आहे. त्यात येणार्‍या अडचणी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण, आदितीताई व आताचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कायम सहकार्य दिले. राज्य सरकारने मदत केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. असेच सहकार्य सतत मिळावे, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने कामे करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे जीएसटीचे अनुदान पालिकेस सुरू झाले असून येत्या काळात अमृत 2 योजनेंतर्गत मिळालेल्या भरीव निधीच्या माध्यमातून महापालिकने एसटीपी प्लॅन्टची कामे सुरू केली आहेत. येत्या काळात शंभर टक्के ड्रेनेजची कामे झालेली पनवेल ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका होईल.
या समारंभात 650 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये आठ कोटी 15 लाख 51 हजार रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर खारघर व कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण, महापालिका मुख्यालयालगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व उन्नतीकरण, पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण अशा 233 कोटी रुपयांच्या कामांचा, अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मल प्रक्रिया केंद्र उभारणे या 257 कोटी रुपयांचे आणि 148 कोटी खर्चून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था उभारणे या कामांचे ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून भूमिपूजन करण्यात आले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply