अलिबाग, पनवेल : प्रतिनिधी
लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी मंगळवारी (दि. 14) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोपही दिला. पाहुण्या आलेल्या गौराईचा पाहुणचार झाल्यानंतर मंगळवारी त्यांचेही विसर्जन करण्यात आले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 56 हजार 535 गणेशमूर्ती, तर 14 हजार 429 गौरींचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन झाले. गणपती पाठोपाठ रविवारी गौराईचेही आगमन झाले होते. भक्तांनी त्यांची मनोभावे सेवा केली. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला. पूजा केल्यानंतर मनोभावे निरोप दिला. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. हातगाडी, रिक्षा, टेम्पो तर काही ठिकाणी डोक्यावरून गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात आल्या, मात्र कुठेही ढोलताशांचा गजर नाही. गुलालाची उधळण नाही की मिरवणुका नव्हत्या. शांततापूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, पनवेल, तळोजा या चारही प्रभागांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार एकूण 60 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. विसर्जन घाटावर गणेशमूर्तींची नोंदणी, अनाऊन्समेंट सिस्टीम, खबरदारीच्या दृष्टिकोनातून गणेशमूर्त्यांचे सॅनिटायजेशन आदी शिस्तबद्ध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्यांच्या वतीने गणेश विसर्जन करण्यात आले. शहरातील नदीच्या ठिकाणांसह सोसायट्यांच्या आवारातदेखील कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. दीड ते दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन स्लॉट्स पद्धतीला गणेशभक्तांकडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये विसर्जनाच्या वेळेनुसार गणेशभक्त नमूद ठिकाणी विसर्जनासाठी उपस्थित राहिले.
Check Also
‘एसआयआर’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper