पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावरून टीका करणार्यांना विरोधकांवर निशाणा साधला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करीत आहोत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आम्ही नवीन भारताच्या गरजा आणि आकांक्षांनुसार देशाची राजधानी विकसित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहोत. हे नवीन संरक्षण कार्यालय संकुल आपल्या दलांचे कामकाज अधिक सोयीस्कर, अधिक प्रभावी बनवण्याच्या प्रयत्नांना बळकट करेल. आम्ही काम करण्याची नवी शैली स्वीकारली आहे. तुम्ही मला 2014मध्ये सेवा करण्याची संधी दिली. मी सरकारमध्ये येताच संसद भवन बांधण्याचे काम सुरू करू शकलो असतो, पण आम्ही हा मार्ग निवडला नाही. सर्वप्रथम आम्ही ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्यांच्यासाठी स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. देशातील शहिदांना आदर देण्याचे काम केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची वेबसाईटही सुरू केली. आज जेव्हा आपण ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’वर लक्ष केंद्रित करीत आहोत, तेव्हा आधुनिक पायाभूत सुविधांमध्येही तितकीच मोठी भूमिका आहे. सेंट्रल व्हिस्टावर आज जे काम केले जात आहे त्यामध्ये हा आत्मा आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
केजी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे बांधलेली ही आधुनिक कार्यालये राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व कामे प्रभावीपणे होण्यासाठी खूप मदत करतील. राजधानीत आधुनिक संरक्षण एन्क्लेव्हच्या निर्मितीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. जेव्हा आपण राजधानीबद्दल बोलतो तेव्हा ते फक्त एक शहर नसते. कोणत्याही देशाची राजधानी ही त्या देशाची विचारसरणी, दृढनिश्चय, शक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. म्हणून भारताची राजधानी अशी असावी, ज्याचे केंद्र लोक असतील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.