Breaking News

विजय इस्टेटविरोधात गुन्हा दाखल

1200 सदनिकाधारकांच्या फसवणुकीचा आरोप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणार्‍या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे.त्यातील काही ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 कर्जत तालुक्यातील वाकस येथे विजय ग्रुपकडून 100 एकर जमिनीवर गृहप्रकल्प विकसीत केला होता.त्याबद्दलची जाहिरात बघून डॉ. गजानन विनायक कागलकर (वय 44, रा. मानखुर्द, मुंबई) यांनी 2017 मध्ये विजय ग्रुपचे सुनील सोनी यांच्याशी चर्चा करून या  गृहप्रकल्पातील एक सदनिका बुक केली. आणि अनामत रक्कम 9999 रुपये दिली. त्यानंतर कर्जत सबरजिस्टर कार्यालयात 23 ऑगस्ट 2017 रोजी डॉ. कागलकर यांच्या नावे त्या सदनिकेची नोंदणीदेखील झाली. मात्र 2018 मध्ये या गृह प्रकल्पाचे काम बंद झाले.

त्यानंतर विजय इस्टेटमध्ये बुक केलेल्या अनेक सदनिकांधारकांनी मुंबई चर्चगेट येथील रेरा कार्यालयात  तक्रारी नोंदविल्या असून, रेरा न्यायालयाने विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे संचालक अतीव गाला यांना संबंधित सर्व सदनिकाधारकांना घरे देण्यात यावीत किंवा त्यांनी  दिलेली रक्कम व्याजासह परत करावी, असे लेखी आदेश दिले होते. मात्र मागील वर्षभरात विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडकडून कोणत्याही सदनिकाधारकाला व्याजासह रक्कम किंवा सदनिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे  डॉ. गजानन कागलकर यांनी एप्रिल 2021 मध्ये नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्याची खातरजमा करून विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे मालक अतीव गाला यांच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात 18 सप्टेंबर 2021 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर करीत आहेत.

विजय इस्टेटच्या वाकस येथील गृह प्रकल्पात 8000 सदनिका बांधल्या जाणार होत्या. त्यातील सुमारे 1200 घरांची बुकिंग झाली होती. मात्र 2018 पासून तेथील सर्व कामे बंद आहेत. येथे घरांची बुकिंग करणार्‍या सर्वांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे हा जमीन घोटाळा शेकडो कोटींचा असावा आता तर्क बांधला जात आहे.

विजय इस्टेट या गृह प्रकल्पात सदनिका नोंद करणार्‍या जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या तक्रारी द्याव्यात. त्याचा फायदा पोलीस तपासात होईल आणि सर्वांना न्याय देता येईल.

-राजेंद्र तेंडुलकर, प्रभारी अधिकारी, नेरळ पोलीस ठाणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply