भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
पनवेल ः प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर असून ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी, घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे ते स्वत:च घोटाळे करीत आहेत. पोलिसांचा ते बाहुबलीसारखा वापर करीत आहेत. 12 घोटाळेबाजांची नावे तर आलीच आहेत. आज आणखी एक नाव आले आहे. ज्यांनी घोटाळा केलाय त्यांच्या सहकार्यांना एक-दोन दिवसांत अटक होणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला जाताना सोमवारी (दि. 27) पनवेल शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूरला जाऊन अंबामातेचे दर्शन घेऊन राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे घोटाळे उघड करणार आहेत. त्यासाठी सोमवारी त्यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या यात्रेला सुरुवात केली. कोल्हापूरला जाताना त्यांचे पनवेल शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, विकास घरत, अजय बहिरा, अमर पाटील, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सीता पाटील, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोर्चाच्या सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होत्या.
किरीट सोमय्या यांनी, वास्तविक पाहता आपली ही जनजागृती यात्रा आहे. आपण आज सिद्धिविनायकाचे आशीर्वाद विघ्न दूर होण्यासाठी घेतले, तर अंबामातेचे आशीर्वाद राक्षसाचा नाश करण्यासाठी घेतल्याचे सांगून पुढे म्हटले की, मी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन करणार असून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची क्रांती करणार आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवा म्हणून कायदा केला, तर दुसर्या बाजूला शिवसेना, भ्रष्टाचारी सेनेचे उद्धव ठाकरे हे बँक बुडवली त्यांना पाठीशी घालतात. त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना वाचवण्याचे काम करतात. आनंद अडसूळ आणि परिवाराचा सिटी बँकेचा 900 कोटींचा घोटाळा. त्यातील 93 कोटी गायब झाले आहेत. त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये आल्याचे पुरावे आहेत. छोटे गुंतवणूकदार रडत आहेत, पण आता अडसूळांना रडावे लागणार आहे.
राज्य सरकार पोलिसांचा बाहुबलीसारखा वापर करीत आहे. बाहुबली म्हणजे भाई लोकांसारखा वापर करीत आहेत. मला कोल्हापूरला जाताना कोणतेही कारण नसताना थांबवले. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला जास्त सक्रिय राहावे लागते असे सांगून सोमय्या म्हणाले, आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. ज्यांचा घोटाळा बाहेर काढतो ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. आज आनंद अडसूळ यांना अटक झाली हॉस्पिटलमध्ये. हसन मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये. हे आहे काय? मध्यंतरी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. त्या वेळी ठरले असावे घोटाळा काढला की, व्हा हॉस्पिटलमध्ये दाखल. आता म्हणतात सूड घेतायत, पण सूड कोणाच्या विरुद्ध घेतायत. हजारो कोटींचा घोटाळा करणार्यांच्या विरोधात असेल तर किरीट सोमय्या सूड घेणार.
उद्या मी महाराष्ट्र सरकारच्या हसन मुश्रीफ यांचा घोटाळा प्रसिद्ध करणार आहे. मग त्याच्यानंतर लाईन लागणार आहे. मला असे वाटते की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना ट्रेनिंग दिलय की घोटाळे कसे करायचे. त्यातला एक आदर्श घोटाळा उघडकीस आणणार आणि पुढच्या आठवड्यात आणखी एक. नेत्यांचे पैसे ठेवणार्याला लवकरच अटक होणार आहे. त्यांना संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे ट्रेंनिग आहे. घोटाळ्याचे जे पैसे ठेवतात आणि मनी लॉण्डरिंग करतात त्यांच्यावरही कारवाई हवी. म्हणून आता घोटाळेबाज मंत्र्याबरोबरच हे पैसे ठेवण्याचे पाप करणार्यांनाही सोडणार नसल्याचे यावेळी सोमय्या यांनी सांगितले
आपल्याला पहिल्या दिवसापासून म्हणजे कोरोना सुरू होण्यापूर्वीपासून मला फक्त साथच नाही दिली, तर योगदान देणारे आणि 41 बंगल्यांच्या जंगलात जाऊन त्यात इन्फेक्शन करण्याची प्रेरणा देणारे आपले खास मित्र म्हणून सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा उल्लेख केला. त्यांनीच मला तुम्ही रायगडचे जावई आहात. त्यामुळे पहिला घोटाळा कर्नाळा बँकेचा काढा, असे सांगितले. त्यातील 52 हजार गुंतवणूकदारांपैकी 50 हजार गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्याचा इतिहासपण आम्हीच करणार असल्याचेही सोमय्या या वेळी म्हणाले.
भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्या यांचा अभिमान -आमदार प्रशांत ठाकूर
भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ किरीट सोमय्या यांची पनवेलची जनता खर्र्या अर्थाने ऋणी असून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. या बँकेत घोटाळा करून पुन्हा राजाचे राजेपण मिरवणार्या भ्रष्टाचारी विवेक पाटलांना ईडीच्या मार्फत तुरूंगात टाकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे किरीट सोमय्या यांचा आम्हाला अभिमान आहे. महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी सरकारने आपला धसका घेतल्याने जिथे जाता तिथे बंदी करून तुम्हाला परत पाठवतात, पण कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि मुंबईच्या सिद्धिविनायकाचा आशीर्वाद तर तुम्हाला आहेच, शिवाय या यात्रेला महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा आशीर्वाद असल्याने त्याच्या जोरावर आपण हे घोटाळे उघड करीत राहाल, असा आम्हाला विश्वास आहे, असे या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्षआमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.