आबुधाबी ः वृत्तसंस्था
सलग दोन पराभव पत्करलेल्या भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील सुपर-12मधील पुढील सामना बुधवारी(दि. 3) अफगाणिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकून विजयाचे खाते खोलण्यास उत्सुक असेल. वर्ल्डकपमध्ये भारताचा समावेश दुसर्या गटात आहे. या गटातून पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असून पाचव्या स्थानावरील भारताची निव्वळ धावगती फारच खालावलेली आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबिया या संघांविरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. शिवाय अन्य संघांच्या विजय-पराजयावरही भारताचे उपांत्य फेरीचे आव्हान अवलंबून आहे. हे म्हणजे जर-तरसारखे आहे. संघनिवड हा विषय भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आयपीएलमधील कामगिरीचा आणि खेळाडूंच्या पूर्ण तंदुरुस्तीचा आढावा न घेता राष्ट्रीय निवड समितीने संघ जाहीर केला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सातत्याने दुखापतींनी भेडसावले असून त्याची कामगिरीसुद्धा निराशाजनक आहे. ट्वेन्टी-20मधील भारताचा सर्वोत्तम लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलऐवजी राहुल चहरला दिलेले प्राधान्य आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हमखास चमकणारा सलामीवीर शिखर धवनऐवजी युवा इशान किशनवर दर्शवलेला विश्वास, असे काही मुद्देसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper