Breaking News

एसटी कर्मचारी मागणीवर ठाम

आझाद मैदानात संपकर्‍यांचे तीव्र आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे.  मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले होते. या आंदोलनात आता भाजपने जाहीर पाठिंबा दिला. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांच्या जीवाशी राज्य सरकारने खेळू नये. सरकारने काढलेला जीआर तत्काळ रद्द करून एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा दोन ओळीचा नवीन जीआर काढावा व विलीनीकरणाच्या निर्णयाला तत्त्वतः मान्यता द्यावी. यात चालढकलपणा करण्यात अर्थ नाही.
आंदोलन दडपण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. जेवढे कर्मचार्‍यांना दाबाल, तेवढे ते उसळून उठतील. कर्मचारी आझाद मैदानाताच नाही तर मंत्रालयात ही घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत. राज्य सरकारने विलीनीकरणाची आधी घोषणा करावी, त्यानंतर त्याचे आर्थिक गणित मांडावे. आपण कर्मचार्‍यांच्या बाजूने आहोत की विरोधात, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
कोल्हापुरात कामगाराने केला आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर : एसटी कर्मचार्‍यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. यातच कोल्हापुरातील आज मध्यवर्ती बसस्थानकात धक्कादायक प्रकार घडला. गगनबावडा आगारातील सदानंद कांबळे नावाच्या कर्मचार्‍याने आगारातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सदानंद कांबळे नावाचा कर्मचारी गळफास लावून आत्महत्या करत असतानाच उपस्थित कर्मचार्‍याने प्रसंगावधान दाखवत कर्मचार्‍याला वाचवले.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply