Breaking News

मंत्री नवाब मलिकांविरोधात भारतीय युवा मोर्चा आक्रमक

मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 10) मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या परिसरातील वातावरण तापले होते. या वेळी पोलिसांनी भाजयुमोच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.
भाजयुमोच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अचानक मंत्रालयावर धडक दिली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. या वेळी नवाब मलिक हाय हायच्या घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देतानाच नवाब मलिक यांचा पुतळाही जाळला. त्या वेळी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विक्रांत पाटील यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलन अधिकच चिघळले. आंदोलकांनीही स्वतः अटक करून घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती.
दरम्यान, औरंगाबादमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांती चौक परिसरात हे आंदोलन सुरू असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव या ठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply