अलिबाग : प्रतिनिधी
एसटी कर्मचार्यांच्या संप काळात खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून भरमसाठ भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एसटी, आरटीओ आणि पोलीस यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रवासी उचलण्याच्या महत्वाच्या ठिकाणी गस्त घालून खाजगी वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. प्रवाशांकडून भरमसाठ भाडे आकारणार्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करूनदेखील संपकरी एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. कारवाईचा बडगा उगारुन शेकडो कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तरीदेखील कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात कामानिमित्त येणारे नागरिक, दररोज नोकरीला येणारा कर्मचारी वर्ग यांना याचा मोठा फटका बसतो आहे. बर्याच शाळा सुरू झाल्या आहेत. ज्यांच्याकडे पास आहेत, त्या विद्यार्थ्यांना पैसे भरून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
या परिस्थितीत खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नियमित दरापेक्षा भरमसाठ भाडे आकारले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी या खाजगी वाहतूकदारांवर प्रशासनाची नजर आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात एसटीचे अधिकारी, पोलीस आणि आरटीओ अधिकारी यांची पथके तयार करण्यात आली असून ती महत्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांकडून जादा भाडे आकारून त्यांची लूट करू नये अशा सूचना देण्यात येत आहेत. असे भरमसाठ भाडे कुणी आकारत असेल तर तक्रार करण्याचे आवाहन रायगड आरटीओने केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper