नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कार्यालयीन कामकाजात शिस्त रहावी व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांनंतर शनिवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणार्या 33 अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले आहे.
बदल्यांमध्ये कायमस्वरूपी महापालिका आस्थापनेवर असलेले 17 अधिकारी आणि कर्मचारी तसेच 16 करार पद्धतीवरील कर्मचारी अशा एलबीटी विभागातील एकूण 33 कर्मचार्यांचा समावेश आहे. या बदल्यांद्वारे पारदर्शक कामकाजाला महत्त्व दिले जात असून दैनंदिन कामकाजात गतिमानताही येणार आहे, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला.
महापालिकेतील लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आल्यावर महापालिकेवर विविध स्तरांतून टीका केली जात आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी मलाईदार खात्यातच चिकटून बसले आहेत. त्यामुळे त्यांचा कारभार भ्रष्ट होत चालला आहे, हे रोखण्यासाठी नियमानुसार दर अडीच वर्षांनी बदली होणे अपेक्षित आहे, मात्र अनेक वर्षांपासून हे अधिकारी-कर्मचारी एकाच खात्यात जागा अडवून बसले आहेत. त्यांच्या बदल्या होत नसल्याने गैरकारभार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर त्यांच्या बदल्या होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.