सातारा, सांगली ः प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बड्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे, तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
पाटण सोसायटी मतदारसंघात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांनी देसाई यांचा 14 मतांनी पराभव केला. पाटणकर यांना 58, तर देसाई यांना 44 मते मिळाली.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघात माजी मंत्री शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, मात्र पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. आमदार शिवेंद्रराजे समर्थक रांजणे यांना 25 मते, तर राष्ट्रवादीचे आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली. अशा प्रकारे रांजणे यांनी शिंदे यांच्यावर केवळ एका मताने निसटता विजय मिळवला. शिंदेंच्या पराभवामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला या ठिकाणी केराची टोपली दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिंदे यांचा पराभव होताना दुसरीकडे खटाव सोसायटी मतदारसंघातून बंडखोरी केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे कारागृहात असतानाही निवडून आले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि सांगली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ऐनवेळी निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेणारे प्रकाश जमदाडे यांनी आमदार सावंत यांचा पराभवाची धूळ चारली. सावंत हे कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मामा आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी ‘योग्य कार्यक्रम’ करण्यात आल्याची जोरदार चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत बँक-पतसंस्था गटात भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलच्या राहुल महाडिक यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव करीत बँकेत एण्ट्री केली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयावर दगडफेक
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शिंदे अवघ्या एका मताने पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरात आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे सातार्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याचीही चिन्हे आहेत.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …