देशाच्या भवितव्यासाठी होणार्या लोकशाहीच्या उत्सवातील चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.आता वेळ मतदारांची आहे. त्यांनी आपले बहुमोल मत लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचा विकास करणार्या उमेदवाराला, राजकीय पक्षाला देणे गरजेचे आहे.
लोकसभेच्या महासंग्रामातील चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश असल्याने पुढील पाच वर्षासाठी आपला दिल्लीतील प्रतिनिधी कोण असावा याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मावळवासीयांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची असल्याने देशाला प्रगतिपथावर कोणता राजकीय पक्ष अथवा नेता नेऊ शकतो याचा विचार करून त्या पक्षाचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. ते ओळखूनच मतदारांनी योग्य तो निर्णय घेऊन मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदार राजा जागा हो, असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. या मतदारसंघातील मतदार हा चाणाक्ष आणि योग्य तो निर्णय घेणारा आहे. आतापर्यंत दोन वेळा या मतदारसंघातील जनतेने भगव्याच्या शिलेदारास निवडून दिले असून, त्यांनी आपापल्या परीने रायगडच्या विकासात हातभार लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यामुळे या वेळीही मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देणाराच प्रतिनिधी लोकसभेत विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. हा मतदारसंघ कोकण आणि घाटमाथा यामध्ये विभागलेला असल्याने शिवाय आर्थिक राजधानी मुंबईला समिप असल्याने गेल्या काही वर्षात या भागाच्या परिसरातील विकासाचा वेग कमालीचा वाढला आहे. तो वेग असाच टिकवायचा असेल, तर ज्या सरकारने या विकासकामांना चालना दिली, तेच सरकार पुन्हा सत्तेवर येणे हे गरजेचे आहे ते ओळखूनच जनतेने डोळसपणे मतदान करणे आवश्यक आहे. उगीच कुणालाही आपले बहुमोल मत देऊन मतदारसंघातील जनतेला विकासापासून वंचित ठेऊ नका, असे कळकळीचे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत. गेले महिनाभर राजकीय प्रचारांनी मतदारसंघ ढवळून निघालाय. आरोप, प्रत्यारोपांची राळ सर्वच स्तरातून उठली आहे. असे आरोप हे निवडणुकीच्या काळात होतच राहतात. निवडणुकीचा धुरळा शांत झाला की सारे जण हे आरोपही विसरून जातील, पण तुम्ही केलेले मतदान मात्र कुणीही विसरू शकणार नाही. तुमच्या एका मताने देशाचे भवितव्य घडते आणि बिघडतेय हे ध्यानात ठेवा आणि मतदानाचा हक्क बजावा. मत कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा, पण मतदान करा. उगीच लोकशाहीच्या फाजिल गप्पा मारण्यापेक्षा मतदान करून आपले कर्तव्य बजावा. मतदान करून लोकशाही बळकट करा आणि देश घडवा, असे आवाहन विविध माध्यमातून केले जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने नेहमीच मतदानाला प्रतिसाद दिला आहे. मग ती निवडणूक लोकसभेची असो अथवा ग्रामपंचायतीची. त्यामुळे सोमवारी होणार्या मतदानात या मतदारसंघातील जनता स्वयंस्फूर्तीने सहभागी होईल, अशी अपेक्षा आहे.