Breaking News

आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजपची टीका

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी (दि. 27) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे, मात्र एक हजार चौरस फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे. भाजपनेही सरकारवर शरसंधान साधले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर चर्चेअंती हा वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने राज्यात नवे वाईन
धोरण राबवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने आता वाईन सुपर मार्केटमध्ये विकण्यास परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही -फडणवीस
राज्य सरकारच्या या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंवद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त. दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी.

मस्त पियो, खूब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधाची आवश्यकता आहे, पण दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका आहे.
-सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते व माजी मंत्री

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply