राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंची जहरी टीका
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून निजामपूर येथे बुधवारी (दि. 27) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आपापसात मतभेद आहेत. माणगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माणगावमध्ये शिवसेना व मित्र पक्षांच्या आघाडीने सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत केले आहे.
राष्ट्रवादीच्या निजामपूर येथे झालेल्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी भविष्यात रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेसोबत दोन हात करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.