Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे पोलिसांच्या बदल्या रद्द

परमबीरांनंतर कुंटेंचा खळबळजनक दावा

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, असा गौप्यस्फोट कुंटे यांनी केलाय. त्यांनी पोलीस बदल्यांबाबत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी)आपला जबाब नोंदवला आहे.
परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. काही अधिकार्‍यांनी चार्ज घेतला होता, पण या बदल्या रद्द केल्या गेल्या. यावर ईडीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुंटे यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, या बदल्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे बदल्या न करता पूर्वस्थिती ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच याबाबत पोलीस आयुक्तांनाही सांगा, असेही सांगण्यात आले होते.
बदल्यांबाबत कोणाच्या तक्रारी होत्या आणि का तक्रार होती याची कल्पना आपल्याला नसल्याचे सीताराम कुंटे यांनी ईडीला सांगितले तसेच प्रत्येक बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख असायचे. अनेक वेळा देशमुख हे अनऑफिशली लिस्ट द्यायचे आणि फायनल लिस्टमध्ये त्यातील बहुतेक नावे असायची, असेही कुंटेंनी म्हटले आहे, मात्र ती लिस्ट कोण देत होते आणि त्यामागील हेतू काय याबाबत देशमुखच अधिक माहिती देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply