Breaking News

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

मुंबई ः प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे  तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी (दि. 3) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार असून 14 ते 3 मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन होईल. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने 70 ते 80 गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून 40 ते 60 गुणांच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे, तसेच 15पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र असणार आहे. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.
परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल.
कोरोनामुळे अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन 75 टक्के अभ्याक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथे परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.
परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कोरोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल तसेच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावे लागणार आहे तसेच 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.
लसीकरण बंधनकारक नाही
सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक असणार का, असा प्रश्नही उपस्थित होत होता, परंतु परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, तेदेखील परीक्षेसाठी हजर राहू शकतात.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply