Breaking News

तिसरी लाट ओसरतेय!

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. ज्या वेगाने रुग्णवाढीचा आलेख गेल्या महिन्यात उंचावला होत्या त्याहून अधिक गतीने तो खाली येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यावसायिकही सुखावले आहेत. असे असले तरी यापुढील काळातही आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.  कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. नव्याने आढळणार्‍या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून देशात गेल्या 24 तासांत एक लाखांहून कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एक दिवसात 83 हजार 876 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एक लाख 99 हजार 54 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. म्हणजेच नव्याने आढळणार्‍या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाने गेल्या 24 तासांत 895 जणांचा मृत्यू झाला ही चिंता व्यक्त करणारी आकडेवारी म्हटली पाहिजे. अर्थात यातही चढ-उतार होत आहेत. देशात कोरोनाचे 11 लाख आठ हजार 938 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी होऊन आता 7.25 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले अनेक जण घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. देशातील तिसरी लाट थोपवून धरण्यात जे यश आले त्याचे श्रेय निर्विवादपणे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांनी देशात जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम राबवून ती यशस्वीदेखील करून दाखविली आहे. देशात लसीकरण मोहीम प्रगतिपथावर असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सध्या 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या मूळ तसेच फ्रन्टलाइन वर्कर्स, आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांना प्रिकॉशन (बूस्टर) डोसवर भर दिला जात आहे. देशात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळणार आहे. केवळ एक डोस पुरेसा असलेल्या स्पुटनिक लाईट लसीच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध महानियंत्रक संस्थेची (डीसीजीआय) परवानगी मिळाली आहे. ‘डीसीजीआय’ने मंजुरी दिलेली ही भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील नववी लस असेल, पण या सर्व लसींमध्ये स्पुटनिक लाईट ही एकमेव सिंगल डोसवाली लस आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी स्पुटनिक लाईट या रशियन लसीचा आपल्या देशभरात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दिली. स्पुटनिक लाईटचा एकच डोस कोरोनाविरुद्ध 93.5 टक्के प्रभावी आहे. तज्ज्ञांच्या मते हा बूस्टर डोस म्हणूनदेखील खूप प्रभावी आहे. सहा महिन्यांत प्रशासित केलेल्या स्पुटनिक लाईट लसीचा बूस्टर डोस कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनविरुद्ध 100 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आल्याचादेखील दावा करण्यात आला आहे. एकीकडे कोरोना संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे लसीच्या संरक्षक कवचाची व्याप्तीही वाढत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकही आनंदी आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी मागील लाटांचा कटू अनुभव लक्षात घेऊन पुढील काळातही सावधानता बाळगणे गरजेचे आहे आणि तेच सर्वांच्या हिताचे आहे हे वेगळे व नव्याने सांगायला नको.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply